कापसाला सोन्याचा भाव ५० वर्षातील विक्रमी दर, ११८४५ रुपये प्रति क्विंटल फायदा कोणाला ?
या वर्षी खरीप हंगामातील पांढऱ्या सोन्याचे म्हणजेच कापसाचे उत्पादन कमी झाल्याने भाव तेजीत राहणार आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी सुरवातीपासून कापूस साठवणूकीवर भर दिला होता. परंतु अपेक्षेप्रमाणे भाव मिळतात शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने का होईना कापसाची विक्री केली आहे.
शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा नक्कीच झाला परंतु यापेक्षा कित्येक पटीने फायदा हा व्यापाऱ्यांना होताना दिसत आहे. कारण शेतकऱ्यांनी विक्री केल्यानंतर आता कापसाला विक्रमी दर मिळाला आहे.अकोला जिल्ह्यातील अकोट बाजार समितीमध्ये कापसाला गेल्या ५० वर्षात कधी दर मिळाला नसेल तितका दर मिळाला.
११ हजार ८४५ असा विक्रमी दर मिळाला आहे. शेतकऱ्यांनी साठवणूक केलेल्या कापसाची विक्री केली. त्यामुळे वाढत्या दराचा फायदा हा व्यापाऱ्यांनाच होत असल्याचे चर्चा आहे. वाढीव दर मिळवण्यासाठी सबंध चार महिने जे शेतकऱ्यांनी केले त्यापेक्षा महिनाभरात अधिकचा मोबदला हा व्यापाऱ्यांना मिळालेला आहे.
कापसाचे उत्पन्न कमी मात्र दर वाढीमुळे दिलासा
खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे सर्वच पिकांचे नुकसान झाले. यात सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कापूसचं पीक अंतिम टप्यात असतानाच ढगाळ वातावरणामुळे बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादन निम्म्यावरच आले होते. महाराष्ट्रसह इतर राज्यामध्येही कापसाचे उत्पादन कमी झालं आहे. गेल्या काही वर्षापासून कापूस क्षेत्रात घट होत असतानाच घटलेले उत्पादन यामुळे यंदा विक्रमी दर मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. अखेर तो सत्यात उतरला असून वाढीव दरामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
५० वर्षातला विक्रमी दर
अकोला जिल्ह्यातील अकोट बाजार समिती ही कापसाची मुख्य बाजारपेठ आहे. जिल्ह्यासह इतर भागातूनही कापसाची मोठी आवक या ठिकाणी होत असते. सध्या शेतकरी केवळ फरदडचा कापूस विक्रीसाठी आणत आहेत. असे असतानाही हंगामाच्या अंतिम टप्प्यात कापसाला तब्बल ११ हजार ८४५ असा विक्रमी दर मिळाला आहे. कापसाची वाढलेली मागणी आणि घटलेला पुरवठा यामुळेच हे शक्य झाले आहे. अखेरच्या टप्प्यात शेतकऱ्यांनी साठवलेला कापूस विकला आणि आता त्याचाच फायदा व्यापाऱ्यांना झाला आहे. शिवाय हे दर टिकून राहतील किंवा यामध्ये वाढच होणार असल्याचा अंदाज आहे.
काळाच्या ओघात अकोला जिल्ह्यातही कापसाचे क्षेत्र हे घटले आहे. कापसाचे दर आणि बोंडअळीमुळे होणारे नुकसान यामुळे शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल करुन खरिपात सोयाबीन लागवड मोठ्या प्रमाणात केली. पण यंदाचे उत्पादन आणि मिळालेले विक्रमी दर यामुळे पुन्हा कापसाच्या क्षेत्रात वाढ होईल असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.