Summer crop l उन्हाळ्यात अशी घ्या पिकांची काळजी..
देशातील अनेक भागात उष्णतेची लाट सुरू झाल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गेल्या अनेक दिवसांच्या हवामानाचा अंदाज घेतला तर तापमानात अचानक ६ ते ८ अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अशा स्थितीत यंदा उष्णतेच्या लाटेने आपला प्रभाव दाखवायला सुरुवात केली आहे.
उष्णतेच्या लाटेचा परिणाम सामान्य जनजीवनावरच नव्हे तर कृषी क्षेत्रावरही दिसून येत आहे. उच्च तापमानाचा रब्बी पिकांच्या उत्पन्नावर वाईट परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. काढणीसाठी तयार असलेल्या पिकांवरही त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.
अशी घ्या पिकांची काळजी
नवीन लागवड केलेल्या व लहान कलमांना सावली करावी. यामुळे कलमांची मर होणार नाही. तसेच बागेत जैवीक आच्छादनाचा वापर करावा. बागेस सकाळी, संध्यांकाळी किंवा रात्री पाणी द्यावे.भाजीपाला पिके परिपक्व भाज्या विशेषतः टरबूज आणि खरबूज या फळांची ताबडतोब काढणी करून त्यांना सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावे किंवा विक्री करावी.
कोरडे व उष्ण वाऱ्यापासून संरक्षणासाठी शेताच्या चारही बाजूंनी शेवरीसारख्या पिकाची अथवा वाफ्याभोवती मक्याची दाट लागवड करावी. रोगप्रतिकारक जातींची निवड, सिंचनाचे व्यवस्थापन, रासायनिक व सेंद्रिय खतांचे योग्य संतुलन याकडे लक्ष द्यावे.
फळांची काढणी शक्यतो संध्याकाळी करावी.
खाजगी हवामान अंदाज एजन्सी स्कायमेटचा अंदाज आहे की, राजस्थानच्या पश्चिम भागावर प्रतिचक्रवात अस्तित्वात आहे. त्यामुळे देशाच्या उत्तर-पश्चिम आणि मध्य भागात उष्ण आणि कोरडे वारे वाहत आहेत. येत्या २४ तासांत तापमानात २ ते ३ अंशांनी घट होण्याची शक्यता असून त्यामुळे अनेक भागांतून उष्णतेची लाट कमी होण्याची शक्यता असल्याचे एजन्सीचे मत आहे.
कृषी तज्ज्ञांनीही उष्ण हवामानाबाबत आपल्या अंदाजात म्हटले आहे की, उच्च तापमान एक-दोन आठवडे कायम राहिल्यास उत्तर भारतातील पिकांवर त्याचा वाईट परिणाम होईल. या हवामानाचा पंजाब, हरियाणा, राजस्थानचा काही भाग आणि उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागातील रब्बी पिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
तसेच तीव्र उष्णतेमुळे गडगडाटी वादळे, गारपीट किंवा धुळीचे वादळ यासारख्या तीव्र मान्सूनपूर्व घडामोडी घडू शकतात. या घडामोडींमुळे कापणीसाठी तयार असलेल्या पिकांचेही नुकसान होऊ शकते.
जनावरांची काळजी घेणे महत्त्वाचे
उन्हामुळे मानवी शरीराची जसी लाहीलाही होते त्याच प्रमाणे जनावरांनाही वाढत्या उन्हाचा त्रास हा होतोच. म्हशींमध्ये उष्णतेस असणारी कमी प्रतिकारशक्ती यामुळे दूध उत्पादनावर, शरीर पोषणावर व प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. दूध देणाऱ्या जनावरांना थंड हवामान मानवते. जनावरे सतत उन्हाच्या संपर्कात येत असतील. तर त्याच्या आरोग्यावर परिणाम होतो. पशुधनाच्या शेडच्या पत्र्यास पांढरा रंग द्यावा. पत्र्यावर गवताचे, तुराट्याचे किंवा ऊसाच्या पाचटाचे आच्छादन करावे.
दुधाळ जनावरांना पिण्यासाठी पुरेसे स्वच्छ व आरोग्यदायी पाण्याची व्यवस्था करावी.उन्हाळ्यात कुक्कुटपालनगृह थंड ठेवावे. शेडभोवतीभरपूर झाडांची लागवड करावी.
शेडच्या छतावर गवताने आच्छादन करावे. त्यामुळे तापमान नियंत्रणात राहील. शेडमध्ये एक्सॉस्ट फॅन लावावेत. त्यामुळे गरम हवा बाहेर फेकली जाईल