पिकपाणी

सोयाबीन पेरणी : आता उत्पादनाची चिंता नाही…

Shares

सोयाबीन उत्पादन घेताना नुकसान टाळण्यासाठी लागवडीपासून ते काढणीपर्यंत आपण सर्व प्रकारची काळजी घेऊन योग्य व्यवस्थापन केले तर सोयाबीनचे चांगले उत्पादन घेता येईल.

अशी घ्यावी सोयाबीनची काळजी :-

१) सोयाबीन बियाण्याला पेरणीच्या आधी पिशवीत ठेवलेल्या बुरशीनाशकांची प्रक्रिया करून घ्यावी.
२) पेरणीसाठी आणलेल्या बियाण्यांची पिशवी खालून फोडावी आणि बियाण्यांची पिशवी व पिशवीवरील टॅग जपून ठेवावे.
३) शिफारशीप्रमाणे ७५ ते १०० मि. मी. पाऊस पडल्यानंतरच सोयाबीन बियाण्यांची पेरणी करावी. अल्प पावसावर पेरणी केल्यामुळे बियाणे अर्धवट ओलीवर पडते व पुढे २ ते ३ दिवस पाऊस न पडल्यास कुजून खराब होते.
४) सोयाबीन बियाण्यांची ४ ते ५ सें. मी. पेक्षा जास्त खोलीवर पेरणी करू नये.
५) मध्यम ते भारी जमिनीत सोयाबीनची पेरणी ४ सें. मी. पेक्षा जास्त खोलीवर केल्यास त्याचा उगवण शक्तीवर विपरीत परिणाम होतो. सोयाबीन पेरणीनंतर लगेचच मोठा पाऊस झाला तर बियाणे वाहून जाते किंवा दडपते व रोपांच्या संख्येत घट होते.
६) सोयाबीन बियाण्यांची धूळपेरणी करू नये.
७) यांत्रिकीकरणाच्या सुलभतेमुळे अनेकदा जमिनीची जास्त मशागत केली जाते. जमीन बर्याच खोलीपर्यंत भुसभुशीत केली जाते. अशा जमिनीत पेरणी करताना बी खोलवर पडते. नंतर जोरात पाऊस झाल्यास जमीन थापली जाते व त्याचा बियाणे उगवण शक्तीवर विपरीत परिणाम होतो.
८) पेरणीपूर्वी सोयाबीन बियाण्यांची साठवण ओलसर ठिकाणी करू नये त्यासोबतच, एकावर एक जास्त पोती रचून ठेवल्यास पोत्यांवर जास्त दाब पडेल अशा ठिकाणी सोयाबीन बियाण्यांची साठवण करणे टाळावे.
९) सोयाबीन बियाण्यांचे कवच अतिशय नाजूक असल्यामुळे बियाणे हाताळताना जास्त आदळआपट होणार नाही, याची काळजी घ्यावी.

१) पेरणीसाठी कृषी विद्यापीठाने शिफारस केल्याप्रमाणे बियाणे मात्रा वापरावी. शिफारशीपेक्षा कमी बियाणे वापरू नये.

२) पाणी साचलेल्या जमिनीत पाण्याचा निचरा होईपर्यंत पेरणी करू नये.

३) पेरणी झाल्यावर पाऊस न आल्यास पाणी देण्याची व्यवस्था असल्यास ताबडतोब पाणी द्यावे.

४) सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणात उंटअळी, तंबाखूची पाने खाणारी अळी तसेच केसाळ अळींचा प्रादुर्भाव होत असतो. या किडींचे नियंत्रण करण्यासाठी बीजोत्पादकांनी पिकावर

५ मि. लि. फेनव्हेलरेट (२० टक्के प्रवाही),

२० मि. लि. क्विनॉलफॉस (२५ टक्के),

१० मि. लि. इन्डोक्साकार्ब (१४.५ टक्के प्रवाही),

१३ मि. लि. ट्रायझोफॉस (४० टक्के प्रवाही),

२० मि. लि. क्लोरोपायरिफॉस (२० टक्के प्रवाही) यांपैकी कोणतीही फवारणी २ वेळा करावी. तसेच ५ मि. लि. फ्लुबेनडीयामाईड व ईमॉमेक्टिन बेन्झोएट घटक असलेल्या कीटकनाशकाची (७ ते १० ग्रॅम) १० लिटर पाण्यात मिसळून एक वेळा फवारणी करावी. जेणेकरून किडीमुळे बियाणे उत्पादकता तसेच गुणवत्ता कमी होणार नाही.

५) सोयाबीन बियाण्यांचा क्षेत्रीय ह्रास टाळण्याकरिता पीक फुलोरा अवस्थेत (आर-२ स्टेज) असताना व शेंगातील दाणे पक्व (आर-६ स्टेज) झाल्यावर सोयाबीन पिकावर मॅन्कोझेब (०.२ टक्के) व कार्बेन्डॅझिम (०.१ टक्के) बुरशीनाशकाची फवारणी करावी. कीटकनाशकांच्या फवारणीसोबत बुरशीनाशकांची दोन वेळा फवारणी करावी. त्यामुळे कीड नियंत्रित होऊन बुरशीमुळे बियाण्यांचा क्षेत्रीय ह्रास होणार नाही.

६) सोयाबीन बियाण्यांची कापणी व मळणी योग्य वेळी करावी. मळणीनंतर बियाणे वाळवल्यानंतर योग्य प्रकारे साठवणूक करावी. थ्रेशरने मळणी करताना सोयाबीनचे कवटे थ्रेशरमध्ये सारख्या प्रमाणात टाकावे. कमी प्रमाणात टाकल्यास सोयाबीन बियाण्यांना इजा होऊन त्याचा उगवण शक्तीवर विपरीत परिणाम होतो.

७) बीजोत्पादन कार्यक्रमातील बियाणे वाळविताना मोठा ढिग न लावता पातळ थरात वाळवून मळणी करावी. बीजोत्पादन कार्यक्रमातील सोयाबीन बियाणे मळणी करताना, ट्रॅक्टरवरील थ्रेशरचा वापर टाळावा आणि मळणी यंत्राचे फेरे (आरपीएम) ३५० ते ४५० ठेवावेत व बियाण्यांची आर्द्रता १३ ते १४ टक्क्यांपेक्षा जास्त ठेवू नये.

८) सोयाबीन बियाणे साठविताना पोत्यातील बियाण्यांची आर्द्रता १३ टक्क्यांपेक्षा जास्त असू नये. तसेच साठवणुकीमध्ये पोत्यांची थप्पी ७ फुटांपेक्षा जास्त ठेवू नये. बीज प्रक्रिया केंद्रावर सोयाबीन बियाणे पोहोच करताना ज्यूट बारदाण्यामध्ये ५० किलोपर्यंत बियाणे भरून पोहोच करावे.*

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *