ब्लॉग

शेतकरी दिन (प्रॉपर्टी नव्हे जीव गहाण ठेवून केला जाणारा व्यवसाय -शेती ) नक्की वाचा.

Shares

आज २३ डिसेंबर ला शेतकरी दिवस देशभर साजरा केला जातो आणि या दिवशी भारतातील सर्वजण शेतकऱ्यांचे फोटो, व्हिडिओ स्टेटसला टाकत आहेत. परंतु मला असा प्रश्न आहे की रोज आपले पोट भरणाऱ्या अन्नदात्याची वर्षातून एकदाच आठवण यावी का ?
भारत हा कृषी प्रधान देश आहे , असे जगभरात म्हंटले जाते. परंतु गेल्या काही दिवसांपासून कृषी क्षेत्राचे योगदान कमी होतांना दिसून येत आहे.जगाला अन्नसुरक्षा पुरवणाऱ्या अन्नदात्याची उत्पन्न सुरक्षा धोक्यात असल्याचे दिसून येत आहे.पाहिले तर शेती क्षेत्रात प्रचंड संधी आहेत. रोजगाराचा उत्तम स्रोत म्हणून शेतीकडे बघितले जात आहे. अनेक युवक शेती क्षेत्राकडे वळतांना दिसून येत आहेत. शेती क्षेत्रात कृषी उत्पादने, ब्रॅंडिंग , मार्केटिंग, यांत्रिकीकरण असे सकारात्मक बदल घडत चालले आहे. जगभरात होत असलेल्या नवीन चांगल्या बदलाचा परिणाम कृषी ग्रामीण व्यवस्थेवर होत आहे. परंतु यावर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे भाजीपाला, फळे, फुले, कडधान्य एकंदरीत सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शेती बरोबर शेतकऱ्यांचीही दयनीय अवस्था झालेली दिसून येत आहे. अवजारांच्या वाढत्या किमती, वाहतुकीचा वाढत खर्च, दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस अश्या परिस्थितींमुळे शेतीच्या प्रश्नात भर पडत चालली आहे. मात्र, सर्वात महत्वाचे म्हणजे अतिवृष्टी, रोगराई, दुष्काळ अश्या संकटांमुळे शेतकऱ्यांनी त्यांची कष्ट करण्याची जिद्द सोडली नाही. अनेक शेतकरी भर पावसात , शेतात पाणी साठलेले असतांना देखील शक्य तेवढ्या पिकाचे संरक्षण करतांनाचे फोटो, व्हिडिओ आपण टीव्ही , मोबाईलवर पहिले असतील.
सरकार पासून सर्वच जनता शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे,असे सांगितले जात आहे. मात्र प्रत्यक्षात दिसून येत नाहीये. सरकारने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून निघावे यासाठी काही कार्यक्रम राबवले आहेत. मग शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण काय ? अजूनही शेतकरी सतत का संकटात सापडत आहे? आपले म्हणजेच संपूर्ण देशाचे पोट भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आपण आता पर्यंत काय केले ? सध्याची परिस्थिती पाहता ,खरंच आपला देश कृषिप्रधान आहे का ? असे प्रश्न मला तरी पडत आहेत.

अन्नदाता सुखी भव !

टीप – वरील लेखात लेखकाने वैयक्तिक मत व्यक्त केले आहे.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *