शेतात जाण्यासाठी रस्ता नाही ? मग असा करा अर्ज.
नकाश्यामध्ये तुमच्या शेतात जाण्यासाठी रस्ता उपलब्ध असेल परंतु तो रस्ता कोणी काही कारणास्तव अडवला असेल तर तुम्ही तहसीलदारास ऍक्ट १९०६ कलम ५ नुसार अर्ज करू शकता. जेणेकरून तुमचा अडथळा दूर करता येईल. तुम्हाला हा अडथळा दूर करण्यासाठी तहसीलदाराकडे दाद मागता येते. तसेच जर तुमच्याकडे शेतात जाण्यासाठी रस्ताच नसेल तर महाराष्ट्र जमीन अधिनियम १९६६ च्या कलाम १४३ अन्वये तुम्हाला तहसीलदाराकडे नवीन रस्त्याची मागणी करता येते. शेतीची मशागत करण्यासाठी तसेच जास्त उत्पादन बाजारात नेण्यासाठी शेतात जाणारा रस्ता असणे अत्यंत महत्वाचा आहे. शेतात ट्रॅक्टर, ट्रक नेण्यासाठी देखील रस्ता असणे गरजेचे आहे. परंतु जर शेतात जाण्यासाठी तुमच्याकडे रस्ताच उपलब्ध नसेल किंवा कोणी रस्ता देण्यास तयार नसेल तर तुम्ही महाराष्ट्र जमीन अधिनियम १९६६ च्या कलम १४३ अन्वये तहसीलदारकडे अर्ज करू शकतो. आपण आज रस्ता अडवणे, कायदेशीर मार्ग कसा काढावा तसेच शेतात रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी नेमकी काय खात्री करण्यात येते याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.
शेतात जाण्यासाठी रस्ता बनवण्यापूर्वी काय खात्री केली जाते ?
१. ज्या व्यक्तीने शेत रस्त्यासाठी अर्ज केला आहे ती व्यक्ती किंवा त्या जमिनीचा मालक पूर्वी कोणत्या रस्त्याचा वापर करत होता याची तपासणी केली जाते.
२. शेत रस्ता देतांना सर्वात जवळचा रस्ता कोणता यावर विचार केला जातो.
३. शेतात जाण्यासाठी दुसरा रस्ता उपलब्ध आहे की नाही याची चौकशी केली जाते.
४. अर्जदाराने मागणी केलेला अर्ज सारबंधावरून आहे का याची खात्री करण्यात येते.
५. शेतात जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करून देतांना दुसऱ्या शेतजमिनीचे नुकसान होत आहे की नाही. होत असेल तर किती होत आहे याची चौकशी केली जाते.
६. अर्जदारास शेतात जाण्यासाठी रस्ता देणे खरंच गरजेचे आहे का याची खात्री करून लगतच्या शेतातील बांधावरून रस्ता देण्यात येतो. परंतु यामध्ये शेतकऱ्यांचे कमीतकमी नुकसान होईल याची काळजी घेण्यात येते.
७. वरील सर्व गोष्टींची शहानिशा करून तहसीलदार ठरवतो अर्ज मान्य करावा की नाही.
शेतात यंत्रणा, माल , वाहने यांची नेआण करण्यासाठी रस्ता असणे गरजेचे आहे. त्यामुळे तहसीलदाराकडे तुम्ही अर्ज करू शकता.