भरघोस उत्पन्न मिळवून देणारे एरंड पीक
शेतकरी नेहमी कमी खर्चात जास्त उत्पादन घेता येणाऱ्या पिकाच्या शोधात असतात.असेच एक पीक म्हणजे एरंड पीक. एरंड पीक नेहमी शेताच्या बांधावर व घरासमोरील मोकळ्या जागेत पाहायला मिळते. एरंड पासून वंगण निर्मिती मोठ्या संख्येने केली जाते. त्यामुळे बाजारात याची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. या पिकास बाजारात ३,००० ते ३,५०० रुपये पर्यंत बाजारभाव आहे. नवीन पीक घेऊ इच्छिणाऱ्या आणि शाश्वत उत्पन्नासाठी धरपडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हे उत्तम पीक आहे. आपण जाणून घेऊयात एरंड पिकाच्या लागवडीबद्दलची माहिती.
जमीन व हवामान –
१. हलक्या व मध्यम जमिनीमध्ये या पिकाची वाढ उत्तम होते.
२. कोरडे व उष्ण हवामान या पिकास मानवते.
लागवड –
१. खरीप आणि रब्बी हंगामात या पिकाची लागवड करता येते.
२. जून महिन्यामध्ये पुरेसा पाऊस झाल्यानंतर त्याची लागवड करावी.
३. बियाण्यांना पेरणीपूर्वी ५ ग्रॅम प्रति किलोने ट्रायकोडरमा चे बीज प्रक्रिया करून घ्यावी.
४. दोन पिकांमधील अंतर ९० सेंटिमीटर तर दोन ओळींमधील अंतर १५० सेंटिमीटर अंतर ठेवावेत.
बियाणे –
या पिकासाठी ३ ते ५ किलो प्रति एकर बियाणे लागतात.
अंतरपिक –
एरंड पिकामध्ये अंतर पीक म्हणून तूर , हरभरा , उडीद , मूग , चवळी , सोयाबीन हे योग्य अंतर ठेवून घेता येते.
पाणी व्यवस्थापन –
१. या पिकास पाणी कमी लागते त्यामुळे यास पाणी देण्याची गरज भासत नाही.
२. पाऊस पडण्याचा कालावधीत वाढ झाल्यास पाणी देणे आवश्यक ठरते.
काढणी –
१. लागवडीनंतर ५ ते ६ महिन्यांनी हे पीक काढणीस तयार होते.
२. घडामधील २ ते ३ दाणे वाळले की काढणीस सुरुवात करावी.
३. २ ते ३ फेऱ्यात घडाची काढणी करावी.
उत्पादन –
१. जिरायती पीक असल्यास प्रति हेक्टर १० ते २० क्विंटल पीक घेता येते.
२. बागायती पीक असल्यास २० ते ३० क्विंटल प्रति हेक्टर पीक घेता येते.
बाजारात चांगली मागणी असल्याने एरंड्याचा पीक म्हणून विचार करण्यास हरकत नाही.