आले लागवड पद्धत आणि योजना
दररोज च्या जेवणात मसाला म्हणून वापरले जाणारे आले याची लागवड पौराणिक काळापासून केली जाते. आले सुकवून त्याचा सुंठ स्वरूपात देखील वापर केला जातो. आले आपल्या शरीरासाठी उत्तम मानले जाते.
जमीन व हवामान –
१. आल्यासाठी कसदार, उत्तम निचरा करणारी मध्यम खोलीची जमीन सर्वोकृष्ट ठरते.
२. जमिनीवर पाणी तुंबून राहणार नाही याची काळजी घ्यावी.
३. आल्याच्या पिकास दमट व उष्ण हवामान मानवते.
४. पावसाळी पाण्यावर देखील आल्याचे पीक घेता येते.
५. समुद्रसपाटीपासून १०० ते १५०० मी उंची पर्यंतच्या प्रदेशात आल्याची लागवड करता येते.
पूर्वमशागत –
१. आल्याचे गड्डे जमिनीखाली असतात त्यामुळे याची पूर्वमशागत करणे गरजेचे असते.
२. जमीन ३० ते ४० सें . मी खोल लोखंडाच्या नांगराने आडवी , उभी नांगरून घ्यावी.
३. कुवळाच्या ३ ते ४ पाळ्या देऊन माती भुसभुशीत करून घ्यावी.
४. हलक्या जमीनीत सपाट वाफे पद्धत वापरावी.
५. मध्यम व भारी जमिनीत सऱ्यावरंबे पद्धत वापरावी.
६. जमिनीत हेक्टरी २० टन शेणखत मिसळावेत.
बियाणे –
१. महाराष्ट्रात माहीम या जातीची लागवड केली जाते . या जातीमध्ये मोक्या व आंगऱ्या असे दोन प्रकार आहेत.
२. चांगल्या प्रतीचे निरोगी ३ ते ५ सें .मी लांबीचे व २० ते २५ ग्रॅम वजनाचे बियाणे निवडावेत.
३. २ ते ३ सें .मी कोंब रुजण्याइतपत डोळे असलेल्या बियाण्याची निवड करावी.
४. प्रति हेक्टरी साधारणपणे १४०० ते २००० किलो बियाणे लागते.
लागवड –
१. गड्डा लावतांना कोंबांची टोके जमिनीच्या वरच्या बाजूस येतील याची दक्षता घ्यावी.
२. कंद लागवडीच्या वेळेस प्रतिबंधनात्मक उपाय म्हणून डायथेन-झेड-७८ आणि नुवाक्रॉन अनुक्रमे २५० ग्रॅम आणि १०० मि. ली., १०० लीटर पाण्याच्या मिश्रणात बुडवून लावावेत.
३. आल्याची लागवड मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून ते जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करता येते.
आंतरमशागत –
१. लागवडीनंतर १५ ते २० दिवसातच जमिनीच्या वर कोंब दिसू लागतात तेव्हा कोंब्यांना धक्का न लागू देता वाफ्यातील तण काढून घ्यावेत.
२. वेळोवेळी हात खुरपणी करून तण काढावेत.
३. पीक १२० दिवसांचे झाले की हलकी खोदणी करून दुसरा वरखताचा हप्ता द्यावा.
वरखते –
१. लागवडीच्या वेळी १०० किलो अमोनिअम सल्फेट, ३०० किलो सुपर फॉस्फेट व ८० किलो म्युरेट ऑफ पोटॅश वाफ्यात टाकावे
२. त्यानंतर ६ ते ८ आठवड्याने ५० किलो व १२० दिवसांनी १०० किलो युरिया द्यावा.
पाणी –
१. लागवड कार्तचाह हलके पाणी द्यावे.
२. पावसाचा अंदाज घेऊन दार ६ ते ८ दिवसांनी पिकास पाणी द्यावेत.
३. पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
कीड व रोग नियंत्रण –
१. खोडावर उपद्रव करणारी खोडमाशी नियंत्रणासाठी १०० मि .ली. कोणतेही कीटकनाशक १०० लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करावी.
२. कंदमाशीच्या नियंत्रणासाठी १० दाणेदार फोरेट हेक्टरी २० किलो टाकावेत.
३. हुमणी म्हणजेच उन्नी या किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच जमिनीत आले लावतानाच १० % बी . एच .सी ५० किलो हेक्टरी प्रमाण खतासोबत मिसळावेत. तसेच या बरोबर ५०० किलो नीम पेंड दिली तर पिकास खत ही मिळते.
४. जमिनीत पाण्याचा निचरा व्यवस्थित झाला नाही तर नरम कूज जा रोगाचा प्रादुर्भाव होतो. याच्या नियंत्रणासाठी रोगट झाडे समूळ उपटून टाकावीत.
५. पिकाची लागवड फेरपालट आणि उत्तम निचऱ्या होणाऱ्या जमिनीत करणे आवश्यक आहे.
काढणी व उत्पादन –
१. आल्याचे पीक ७ महिन्यात तयार होते . परंतु आले लागवड सुंठासाठी करत असाल तर पीक ८.५ ते ९ महिन्यात तयार होते.
२. जानेवारी महिन्यात पाने पिवळी पडतात आणि वाळून जातात. वाळलेली पाने कापून पाला पाचोळा वेचून घ्यावा.
३. कुदळीने खोदून आल्याच्या गड्ड्यांना इजा होणार नाही याची दक्षता घेऊन काढणी करावी.
४. आले स्वच्छ धुवून वेगवेगळी करावेत.
५. हेक्टरी उत्पादन १० ते १५ टनापर्यंत घेता येते.
६. काढणीच्या वेळेस आल्यास चांगला भाव नसेल तर आले न काढता त्यास दर १० दिवसांनी पाणी देणे सुरु ठेवावे. त्या कंदांवर पुन्हा फुवटे येऊन त्यांची वाढ सुरु होते.
योजना –
१. केंद्र पुरस्कृत मसाला पीक विकास योजनेअंतर्गत सुधारित जाती, तंत्रज्ञान इत्यान्दीचा प्रसार होण्याकरिता शेतकऱ्यांना आल्याचे १० आरचे प्रात्यक्षिक प्लॉटला येणाऱ्या खर्चाच्या ५० टक्के व जास्तीत जास्त रुपये १२०० देण्यात येतात.
२. परसबागेतील आल्याची लागवड करण्याकरिता ५ किलो बेणे आणि पीक सरंक्षणाकरिता खर्चाच्या ५० टक्के व जास्तीत जास्त रुपये १००/- चे मर्यादित अनुदान देण्यात येते.
आल्याची लागवड योग्य पद्धतीने केल्यास त्याचे उत्पादन चांगले येते. आले हे मसाला पिकामध्ये मोडले जाते आणि त्यासाठी काही योजना राबवल्या जातात . या योजनेचा लाभ घेऊन तुम्ही अधिक उत्पन्न मिळवू शकता.