थंडीपासून फळबागांचे संरक्षण
फळपिकांमध्ये तापमान बदलाचा बऱ्याच मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. हिवाळ्यामध्ये १० अंश से. ग्रे. तापमान कमी झाले तरी त्याचा पीक वाढीवर अनिष्ट परिणाम होतो.हिवाळ्यात अति थंड हवामान, थंडीची लाट, धुके, थंड वारे आणि गारा यामुळे झाडांना इजा होते.अशा प्रतिकूल शीत लहरीमुळे फळझाडांचे नुकसान होते आणि त्यापासून फळझाडांचा बचाव करणे आवश्यक ठरते.अशा प्रतिकूल हवामानात फळझाडांवर होणारा अनिष्ट परिणाम आणि त्यापासून फळझाडांचा बचाव कसा करावा याची माहिती फळबागायतदारांना असणे आवश्यक आहे.
हिवाळ्यात फळपिकांवर होणारा दुष्परिणाम –
१. तापमानामुळे झाडांची वाढ मंदावते, जमिनीचे तापमान कमी होते.
२. वनस्पतींच्या पेशी मरतात.
३. फळपिकांमध्ये फळे तडकतात यामध्ये प्रामुख्याने द्राक्षे, केळी, डाळिंब, बोर, अंजीर पपई इत्यादी फळपिकांना हे प्रमाण जास्त असते. अशा फळांना योग्य बाजारभाव मिळत नाही.
४. केळी पिकांमध्ये घड बाहेर पास्त नाही.
५. रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव वाढतो.
६. शीत हवामानामुळे फुले, फळे, पाने, खोड आणि मुळ्या यावर प्रतिकूल परिणाम होतो.
७. अतिशील हवामानात पेशींमधील पाणी गोठून पेशीकणातील पाणी नष्ट झाल्यामुळे त्या शक्तीहीन होऊन पेशी मरू लागतात.
८. पाणी गोठण्याच्या तापमानात झाडाची पाने, खोड यांच्या पेशीमधील पाणी गोठण्याची प्रतिकारशक्ती ज्या प्रमाणात असेल त्या प्रमाणात झाडे अशा शीत हवामानाला प्रतिकार करू शकतात.
९. अतिशील तापमानामुळे खोड आणि फांद्या याच्या आतील भाग काळा पडतो आणि ठिसूळ बनतो.
१०. रोपवाटिकेतील कोवळी फळझाडे यास बळी पडतात.
११. कोवळी पाने, फुट आणि फांद्या सुकतात तसेच बेचक्यातील पेशी मरतात आणि झाडांना इजा पोहचते.
१२. तापमान कमी झाल्यास खोडाच्या सालीला इजा होऊन साल फाटते.
१३. कधी कधी ही इजा खाली मुळ्यापर्यंत पोचते. अशावेळी सालीचा इजा झालेला भाग खरडून जखमेला बोर्डोपेस्ट लावून त्यात बुरशीचा होणारा शिरकाव थांबविता येतो.
१४. उष्ण हवामानात वाढणाऱ्या फळझाडांच्या मोहराला शीत लहरीमुळे जास्त नुकसान पोहचते.
१५. आंब्याचा मोहोर जळतो.
१६. सदारहित झाडे ही पानगळ होणाऱ्या झाडांपेक्षा लवकर आणि जास्त प्रमाणात नाजूक असून ती थंडीच्या दुष्परिणामास बळी पडतात.
१७. तापमान २ अंश से. ग्रे. च्या खाली गेल्यास पपईची वाढ थांबते.
१८. फळांची प्रत बिघडते. जास्त थंडीमुळे झाडे मरतात.
१९. केळीच्या बाबतीत तापमान ४ ते ५ अंश से. ग्रे. च्या खाली गेले तर झाडांची वाढ मंदावते.
२०. पाने पिवळी पडतात, केळफूल बाहेर पडत नाही. फळांना चिरा पडतात.
२१. द्राक्ष वेलीच्या वाढीच्या आणि फुलोऱ्याच्या काळात कडक थंडीचा वाईट परिणाम होतो.
२२. द्राक्षाची फळे गळतात, फळांची प्रत खराब होते. द्राक्षाची कोवळी फुट, पाने आणि मनी यांची नासाडी होते.
२३. तसेच वेली मरतात संत्रा, मोसंबीत १० अंश से. ग्रे. च्या खाली तपमानात वाढ थांबते व फलधारणा होत नाही.
२४. डाळिंब व लिंबू फळांची साल तडकते.
पूर्व दक्षतेचे उपाय –
१. हंगामात मुख्य फळझाडे लहान असल्यास दोन झाडातील मोकळ्या जागेत, उघड्या जमिनीवर दाट पसरणारी आंतरपिके घ्यावीत. उदा. हरभरा, वाटणा, घेवडा, पानकोबी, फुलकोबी, मुग, मटकी इ.
२. केळी, पपई व पानवेलीच्या भोवती दाट शेवरी लावावी.
३. केळीची लागवड, केळफूल कडक थंडीत बाहेर पडणार नाही अशी दक्षता घेऊनच करावी.
४. उष्णतामान आणि वारा यांच्यापासून संरक्षण करण्याकरिता वाऱ्याच्या बाजूने वारा प्रतिबंध झाडांची (सुरु, बोगनवेल, बांबू, घायपात, मलबेरी, शेवगा, शेवरी, खडसरणी, पांगारा, ग्लिरीसिडीया इ.) रांग लावावी.
५. सभोवार मध्यम उंच कुंपण घालून झाडांची लागवड करावी. उदा. शेवरी, मेंदी, चिलार, कोयनेल, एरंडी, घायपात इ. झाडांची सतत निगा व छाटणी करावी.
प्रत्यक्ष नियंत्रणाचे उपाय –
१. डाळिंबाची फळे तडकू नयेत म्हणून नियमित पाणी दयावे.
२. बागेचे थंडीपासून संरक्षण तसेच 0.2 टक्के बोरॅक्सची फवारणी करावी.
३. रोपवाटिकेतील रोपे, कलमे, रोपांचे वाफे यावर रात्री आच्छादन घालावे व सकाळी ते काढावे. त्यासाठी तुराटी, कडबा यांचे तट्टे, काळे प्लॅस्टिक, पोती यांचा उपयोग करावा.
४. पालाशयुक्त वरखत किंवा राख खत म्हणून दिल्यास झाडांची जल व अन्नद्रव्य शोषणाची आणि वहनाची क्षमता वाढून पेशींचा काटकपणा वाढतो. अशाप्रकारे फळझाडांचे कडक थंडीपासून संरक्षण करून संभाव्य नुकसान टाळावे.
५. बागेस रात्री पाणी दयावे, यामुळे जमिनीचे तापमान वाढते व पर्यायाने बागेतील तापमान वाढीस मदत होते.६. लाट येणार हे लक्षात येताच सायंकाळी फळझाडांना विहिरीचे हलके पाणी दयावे.
७. विहिरीच्या पाण्याचे तापमान कालव्याच्या पाण्यापेक्षा थोडे जास्त असते. अशी ओली जमीन लवकर थंड होत नाही.८. झाडांच्या खोडापाशी व आळ्यात गवत, कडबा पाचोळा, गव्हाचे तुस इ. आवरण घालावे.
९. केळीच्या बागेस रात्रीच्या वेळेस पाणी दयावे व 100 ग्रॅम म्यूरेट ऑफ पोटॅश प्रती झाड दयावे.
१०. केळीच्या घडाभोवती व खोडाभोवती त्याच झाडांची पाने गुंडाळावीत.
११. बागेस सभोवती गोणपाट किंवा इतर कापडांचे पडदे लावावेत याचा उपयोग बागेत थंड हवेची लाट अडवली जाते.
१२. फळझाडांच्या ओळीत किंवा बांधावर पहाटेच्या वेळी मध्यम ओलसर पालापाचोळा पेटवून धूर करावा.
१३. त्यात दगडी कोळसा,रबरी जुन्या वस्तू, टायर, ओली लाकडे त्यात टाकून धूर व उष्णता रात्रभर मिळेल असे पहावे.
१४. खराब क्रूड ऑईल जाळून धूर करून वलय करावे.सध्या विविध वर्तमानपत्रे, आकाशवाणी, दूरदर्शन इ. प्रसार माध्यमातून हवामानविषयी प्रसिद्धी दिली जाते. कडक थंडी किंवा थंडीची लाट येणार याची सूचना मिळाल्यास लगेचच उपाय योजना करावी.
ReplyForward |