नफा देणारी कोरफड लागवड
बहुतांश शेतकरी जे कोरफडची शेती करतात त्यांनी अगोदरच एखाद्या कंपनीशी करार केलेला असतो, त्यानुसार त्यांचे पीक तयार झाल्यानंतर ती कंपनी त्यांच्याकडून कोरफडची पाने खरेदी करून घेते. काही शेतकरी असेही आहेत ज्यांनी कोरफड साठी प्रोसेसिंग युनिट उभारले आहेत त्यामध्ये ते स्वतः कोरफडचा पल्प काढून कंपनीना कच्च्या मालाच्या स्वरूपात विकतात. पतंजली, डाबर, बैद्यनाथ, रिलायंस सारख्या नामी कंपनीना कोरफडीच्या खुप मोठ्या प्रमाणात गरज असते. तसेच आजकाल आयुर्वेदिक औषधी बनवणाऱ्या कंपन्या ही बऱ्याच आहेत.
कोरफडचे फायदे –
१. कोरफडीचा रस प्यायल्याने नैसर्गिकरित्या वजन घटण्यास मदत होते.
२. सर्दी आणि खोकल्यावर सुरक्षित आणि प्रभावी घरगुती उपाय म्हणून कोरफडीचा उपयोग करण्यात येतो.
३. कोरफडीच्या रसामुळं आमवाताच्या (रुमेटाइड अर्थ्रायटिस) रुग्णांना होणाऱ्या वेदना व सांध्यांमधील ताठरता कमी होण्यास मदत होते.
४. कोरफडीचा रस प्यायल्याने पित्ताचा त्रास कमी होण्यासही मदत होते.
५. कोरफडीचा रस शरीर डिटॉक्स करण्यास मदत करतो.
६. नियमितपणे कोरफडीचा रस प्यायल्याने दातांचे आरोग्य सुधारते.
लागवड –
१. कोरफड हलक्या, वालुकामय, उत्तम निचऱ्याच्या जमिनीत चांगले येते.
२. लागवडीसाठी योग्य आकाराचे सपाट वाफे किंवा ६० ते ७५ सें.मी. अंतरावर सरी-वरंबे तयार करावेत.
३. कोरफडीची अभिवृद्धी मुनव्यांपासून करतात. पावसाळा सुरू होताच लागवड करावी.
४. या पिकास माती परीक्षणानुसार खतमात्रा द्यावी. पिकाला गरजेनुसार पाणी द्यावे.
५. लागवड केलेल्या वाफ्यात किंवा वरंब्यावर पानांच्या वजनामुळे कोरफड कोलमडू नये म्हणून वेळोवेळी गरजेनुसार मातीचा आधार द्यावा.
खर्च , उत्पन्न आणि नफा –
१. पहिल्या एक वर्षात एकरी अंदाजे ८० हजार ते १ लाख इतका खर्च येतो.
२. जर संपूर्ण वैज्ञानिक पद्धतीने शेती केली गेली तर तज्ञांच्या मते एका एकरात सुमारे १५ हजार ते १६ हजार झाडे लावली जातात.
३. कोरफडची पाने प्रति किलो ४ ते ७ रुपयांना विकली जातात, हा दर शेतकरी आणि कंपनी यांच्यातील करारावर अवलंबून असतो, तर रोपवाटिकामध्ये प्रत्येक
रोपासाठी ३ ते ४ रुपये मध्ये उपलब्ध असतात आणि लगद्याची अंदाजित किंमत २० ते ३० रुपये प्रति किलो असते.
४. पल्प काढून विकला तर 4 ते 5 पट अधिक नफा देखील मिळेल.