शेतकऱ्यांवर नवीन संकट : गाई-बैलांसह जनावरांना आता नव्या रोगाची लागण
शेतीच्या ऐन हंगामात आदिवासी शेतकऱ्यांच्या पशु धनावर रोगाची साथ आलीय. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे . पालघर जिल्ह्यातील तलासरी, डहाणू, जव्हार, मोखाडा, विक्रमगड इत्यादी तालुक्यांमधील पशु वैद्यकीय रुग्णालयात आणि उपचार शिबिरात आदिवासी शेतकरी जनावरांच्या उपचारासाठी रांगा लावत आहेत. जनावरे आजारी पडल्याने आता शेतीची कामे करायची कशी? हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. आधीच जोरदार पडणाऱ्या पावसाने शेतीचे नुकसान झाले आहे. असे असतानाच जनावरांवर हे संकट ओढवले आहे. पावसाळ्यात जनावरांच्या गोठ्यात ओलावा जास्त असतो.
त्यामुळे गोमाशा जनावरांच्या अंगावर भनभनत असतात त्याचा त्रास मोठ्या प्रमाणात त्यांना होतो.
प्रामुख्याने शेळीला होणारा आजार प्रथमच म्युटेड होऊन इतर जनावरांना झाला. यामुळे जनावरे आजारी पडत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागांमधील जनावरे लेम्पि स्किन डिसीज या रोगाने पछाडली आहेत. जनावरांच्या अंगावर पुळ्या फोड येत आहेत. हे फोड मोठे होऊन फुटत असल्याने जनावरांना जखमा होत आहेत. पायाला सूज येत असून अशक्तपणाने जनावरांचे हाल होत आहेत. या अचानक उद्भवलेल्या जनावरांच्या आजाराने बैला अभावी शेतीची कामे रखडली आहे.
हा रोग प्रथमच पशुधनावर दिसून आला आहे. जिल्ह्यात जनजागृतीसह कॅम्प घेतले जात असून जनावरांना लस दिल्या जात आहेत. शेतकऱ्यानी गोचीड, गोमाशांची नियमित फवारणी करून गोठा स्वच्छ ठेवावा असे आवाहन सर्वत्र केले जात आहे. त्यासोबतच जनावरांवर कुठलेही लक्षण दिसल्यास त्यांना तात्काळ जवळच्या पशु वैद्यकीय रुग्णालयात नेऊन उपचार करावेत, असे सांगण्यात येत आहे.