वाटाणा लागवड (पेरणी) दोन महिन्यात भरघोस उत्पादन ..
अशा पद्धतीने करा लागवड
आपल्या आहारात येणारा एक महत्वाचा घटक म्हणजे वाटाणा. वाटाणा हे थंड हवामानातील पीक आहे. वाटण्याची लागवड सर्वत्र मोठ्या प्रमाणात होते. वाटाण्याचे दाणे जेव्हा कोवळे असतात तेव्हा सुद्धा त्या कोवळ्या शेंगा म्हणजेच मटार आपल्या शरीराला पोषक ठरतात. वाटाण्यामध्ये कार्बन, प्रोटिन्स तसेच फॉस्फरस पोटॅशियम हे खनिजे आणि अ, ब, क जीवनसत्वे मोठ्या प्रमाणात असतात. वटाणा हे द्विदल वर्गातील पीक असल्यामुळे हवेमधील आणि जमिनीमधील नत्र शोषून घेण्याची क्रिया मुळांवरील गाठी द्वारे होते. यामुळे जमिनीचा कस वाढतो.
कसे असावे हवामान :- वाटाणा हे थंड हवामानातील पीक आहे साधारण दहा ते अठरा सेल्सिअस एवढे तापमान असल्यास पीक चांगले वाढते व बहरास येते
लागवडीसाठी योग्य जमीन :-
वाटाण्याचे पीक हे सगळ्या प्रकारच्या जमिनीत येते. पण हलक्या व भुरमाठ जमिनीत हे पीक जरा लवकर येते आणि भुसभुशीत व मध्यम जमिनीत या पिकाला थोडा उशीर होतो पण मध्यम स्वरूपाच्या जमिनीत उत्पन्न भरघोस मिळते.
पेरणी अगोदर मशागत कशी करावी :-
वाटाणा हे उत्तम उत्पन्न देणारे पीक असल्यामुळे लागवडीखालील क्षेत्राची चांगली मशागत करणे गरजेचे आहे. जमीन भुसभुशीत आणि नरम असल्यास मुळ्यांची वाढ चांगली होते. मुळे खोलवर रुजतात आणि मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्य शोषण करतात. यामुळे झाडांची वाढ चांगली होते. पेरणी अगोदर जमीन बैलनांगर किंवा इतर अवजाराने नांगरटी करून भुसभुशीत करून घ्यावी आणि ढेकळे फोडण्यासाठी पठाळीचा वापर करून ढेकळे फोडावी.
लागवडीचा हंगाम :-
वाटाण्याचे पीक प्रामुख्याने दोन हंगामात घेतले जाते. पहिला हंगाम जून-जुलै आणि दुसरा म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात.
एकरी लागणारे बियाणे :-
वाटाणा पेरणीसाठी पामरीने किंवा मोगड्याने पेरल्यास एकरी 50 ते 60 किलो बी लागते आणि जर टोकण पद्धतीने पेरल्यास एकरी 25 ते 30 किलो बियाणे लागते. पेरायच्या आधी बियाण्यास प्रति किलो 3 ग्रॅम थायरमची बीजप्रक्रिया करावी. त्यामुळे पिकाची उगमशक्ती भक्कम होते आणि दाणा पटकन उगवतो.
वाटाण्याचे प्रकार आणि जाती :-
वाटाणा लागवडीसाठी दोन प्रकार आहे
1) बागायती म्हणजेच भाजीचा वाटाणा
2) जिरायती किंवा कडधान्याचा वाटाणा
बागायती वाटाण्याचे दोन गट आहेत :-
1) गोल व गुळगुळीत बी असलेले :- या जातीचा वाटाणा सुकवण्यासाठी म्हणजेच सुकून डाळ किंवा इतर पदार्थांसाठी उपयोग करतात.
2) सुरकुतलेल्या बियांचे प्रकार :- या जातीच्या व पाण्यात साखरेचे प्रमाण जास्त असते त्यामुळे वटाणे गोड लागतात. पिठाळपणा कमी असतो. या जातीच्या वाटाण्याचे हिरवे दाणे हवाबंद करून आणि हिरव्या शेंगा बाजारात विकण्यासाठी उपलब्ध असतात. या हिरव्या शेंगांना बाजारात खूप मागणी असते
सुधारित वाण :
1) पटकन येणार वान अर्ली बॅगर, अर्केल, असौजी, मिटीओर
2) मध्यम कालावधीत येणाऱ्या जाती :बोनव्हीला, पर्फेक्शन न्यु लाईन
3) उशिरा येणाऱ्या जाती : एन पी 29, थॉमस लॅक्स्टन
लागवड व खते :-
वाटाण्याची लागवड ही सपाट जमिनीत करतात किंवा सरी पद्धतीने करतात त्यासाठी दीड ते दोन फूट अंतरावर सरी करून दोन्ही अंगास बिया टोचून लागवड केली जाते. दोन बियातील अंतर पाच ते सात सेंटीमीटर ठेवावे. वाटाणा पिकास जमिनीचा पोत पाहून खत वापरले जाते, त्यासाठी साधारण अडीच एकरी 15 ते 20 टन शेणखत, 20 ते 30 किलो नत्र, 50 ते 60 किलो स्फुरद आणि 50 ते 60 किलो पालाश जमिनीचा पोत पाहून द्यावा. जमिनीची मशागत करत असताना शेणखत योग्य प्रकारे मिसळून द्यावे
पाणी भरणा:
कोणत्याही पिकासाठी खतांबरोबर मशागत करून पाण्याचीही खूप आवश्यकता असते पाणी आहे तर जीव आहे त्यासाठी पेरल्यानंतर लगेच पाण्याची भरणी करावी. आपल्या पिकाला पाण्याची आवश्यकता आहे हे ओळखण्यासाठी मध्ये मध्ये मक्याचे ताटे लावावे किंवा दाणे टाकावे. मक्याचे झाड जमिनीतील आर्द्रता शोषते त्यामुळे पाणी कमी पडल्यास ते सुकायला लागते. यावरून आपल्याला पिकाला पाण्याची गरज आहे हे वेळीच ओळखता येते.
कीड व रोग :
वाटाणा पिकावर मावा,आळी भुरी बुरशी हे रोग जास्त असतात
मावा :- मावा ही कीड बारीक खसखशीच्या दाण्यासारखी खोडाला व पानाला फुले व शेंगांना चिटकून बसतात आणि झाडातील अन्नद्रव्ये शोषून घेतात त्यामुळे झाडी वाढत नाही.
उपाय:
मावा या रोगासाठी मॅलॅथीऑन 50 इसी 500 मिली, किंवा फॉस्फॉमिडॉन 85 डब्ल्यू ईसी 100 मिली, किंवा डायमेथॉन 30 इसी 500 मिली, किंवा मिथिलडेमटॉन 25 इसी चारशे मिली, 500 लिटर पाण्यात मिसळून अडीच एकरात फवारणी करावी पेरणीनंतर किमान तीन आठवड्यांनी फवारणी करायला पाहिजे
भुरी :- भुरी रोगामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते या रोगामुळे झाडाच्या फांद्या व पानांच्या दोन्ही बाजूने पांढरा फटक पावडर सारखा बुरशी जंतूंचा थर बसतो आणि थोड्याच दिवसात झाडाला पुर्ण व्यापून टाकतो त्यामुळे झाडाची वाढ खुंटते व कमकुवत होते. फळधारणा बरोबर होत नाही.
उपाय :- यासाठी मार्फोलीन 250 मिली किंवा पाण्यात मिसळणारे गंधक 80 टक्के एक हजार 250 ग्रॅम, किंवा डीनोकॅप 40 डब्ल्यू पी 500 ग्रॅम अडीच एकर याप्रमाणे 500 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, किंवा गंधकाची भुकटी 300 मेश अडीच एकर याप्रमाणे 20 किलो या प्रमाणात फवारणी करावी. नंतर पंधरा दिवसाच्या अंतराने फवारणी करावी रोग नाशक अशा औषधांचा वापर करावा.
मर रोग :- मर हा रोग जमिनीतील बुरशीमुळे होतो, मर रोगामुळे झाड पिवळे पडते.
उपाय पेरणीपूर्वी बियास थायरम हे बुरशीनाशक औषध प्रति किलोस ३ ग्रॅम या प्रमाणात चोळावे.
मळणी किंवा तोडणी : लवकर येणाऱ्या जातीची म्हणजेच हिरव्या शेंगांची तोड केल्यास हेक्टरी 25 ते 26 क्विंटल, तर मध्यम कालावधीत तयार होणाऱ्या जातीचे उत्पन्न 65 ते 75 क्विंटल आणि उशिरा येणाऱ्या जातीचे 85 ते 115 क्विंटल येते. त्यातील पाण्याचे प्रमाण 40 ते 45 टक्के असते.
अशा अतिशय सोप्या वाटाणा लागवड पद्धतीने दर्जेदार उत्पन्न घेता येते. योग्य व्यवस्थापन केले गेले आणि उत्तम निगा राखली गेली तर ही वाटाणा लागवड शेतकरी राजाला भरघोस उत्पन्न देते.
ब्युरो रिपोर्ट – किसानराज डेस्क