सोयाबीनच्या दरात चढ-उतार कायम, शेतकऱ्यांची मात्र द्विधा मनस्थिती
सोयाबीनने डिसेंबर महिन्यात भरारी घेत 6 हजार 600 रुपये दर गाठला होता. हळू हळू भावात वाढ होत असताना सध्या काही दिवसांपासून दर कमी झाले आहेत. अस्थिर असणारे भाव बघता सोयाबीनची विक्री करावी की साठवणूक असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर कायम आहे.
सोयाबीनचा हंगाम सुरु झाल्यापासून सोयाबीनच्या दरात चढ-उतार कायम असल्याने सोयाबीनचा भाव हा चर्चेचा विषय ठरलेला आहे. मागील 15 दिवसांमध्ये सोयाबीनच्या दरात सुमारे 250 रुपयांची घसरण झालेली आहे. तर 8 हजार पोत्यांवरील आवक ही आता 12 हजारांवर आलेली आहे.
खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आला असताना सुद्धा सोयाबीनच्या दरामध्ये जास्त हालचाल दिसून येत नसल्याने ठोकताळा लावताना सर्वांचा संभ्रम होतो आहे. सध्या सोयापेंडच्या आयातीली सुद्धा स्थगिती देण्यात आली आहे त्यासोबतच साठामर्यादेची अटही व्यापारी किंवा प्रक्रिया उद्योजकांवर राहणार नाही. त्यामुळे शेतकरी आता बाजाराचा अंदाज घेऊनच पुन्हा सोयाबीन विक्रीचा निर्णय घेणार असल्याचे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे. परिस्थिती ठळकपणे स्पष्ट होत नसल्याने शेतकरी वर्ग सध्या द्विधा मनस्थितीमध्ये असल्याचे बघायला मिळत आहे.