पैसे वाचवा, गांडूळ खत वापरा !
सध्याच्या काळात शेतीसाठी रासायनिक खतांचा जास्त प्रमाणात वापर केला जातो.त्याचा दुष्परिणाम जमिनीबरोबर पिकांवरदेखील दिसून येतो. काही काळापूर्वी शेतकरी गांडूळ खत , कंपोस्ट खत , गाळाचे खत यांचा वापर करत असत त्यामुळे पीक निरोगी राहत होते, जमिनीची सुपीकता टिकून राहत होती. गांडूळ खत हे शेतीसाठी अत्यंत उपयोगी आहे. गांडूळाला शेतकरी मित्र म्हणून ओळखले जाते. गांडूळ खताचा वापर केल्यास खर्च कमी येतो. गांडूळाच्या शरीरामध्ये उपलब्ध असलेले सेल्युलो लाटकीक, प्रोटोलिटिक, लिग्नो लाइटिक एन्झाईम अशी मुख्य व सूक्ष्म मूलद्रव्ये पिकाच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतात. गांडूळ खताचे अनेक फायदे आहेत ते आपण आज जाणून घेणार आहोत.
गांडूळ खताचे फायदे-
१. गांडूळ खातात पिकास आवश्यक असणारे मूलद्रव्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात.
२. या खतामुळे पाण्याचा निचरा योग्य प्रमाणात होऊन जमिनीची जलधारण क्षमता वाढते.
३. गांढूळ खतामुळे पिकावर उध्दभवणारी रोगराई कमी होते. त्यामुळे कीटकनाशकांचा खर्च कमी होतो.
४. गांढूळ खतात असणाऱ्या सूक्ष्मजीवांमुळे रोगनिर्माण करणाऱ्या सूक्ष्मजीवांचा नाश होण्यास मदत होते.
५. गांडूळ खतामुळे जमिनीचा पोत सुधारतो.
६. गांडूळाच्या बिळांमुळे जमिनीची उत्तम प्रकारे मशागत होते.
७. जमिनीची धूप कमी होण्यास मदत होते.
८. या खताचा वापर केल्यास बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते.
९. जमिनीतील उपयुक्त जिवाणूंची वाढ होते.
१०. ओल्या कचऱ्याचे व्यवस्थापन होते.
११. मातीमधील कस, सूक्ष्मजीव टिकून राहते.
१२. गांढूळ खताचा वापर केल्यास उत्पादन क्षमतेत वाढ होते.
गांढूळ खताचा वापर जमीन , पीक दोघास उपयुक्त ठरते. रासायनिक खतांवर होणार खर्च देखील वाचतो. उत्पादनात वाढ होऊन चांगला नफा मिळण्यास मदत होते.