मूर्ती लहान कीर्ती महान असा आरोग्यदायी ओवा
ओवा हा आकाराने जरी लहान दिसत असेल तरी त्याचे फायदे अनेक आहेत. ओवा चवीला तिखट, कडवट आणि थोडा तुरट असतो. सहसा आपण अन्नपचन चांगले व्हावे यासाठी ओव्याचे सेवन करतो, परंतु या व्यतिरिक्त ओव्याचे अनेक फायदे आहेत.ओव्यांमध्ये लोह , कॅल्शिअम , पोटॅशिअम , केरोटीन आणि आयोडीन असे अनेक मूलद्रवे आढळतात. त्याचबरोबर ओव्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, फायबर आणि प्रोटिन्स देखील उपलब्ध असतात.भारतात ओव्याची लागवड उत्तर प्रदेश, महाराष्ट्र , मध्य प्रदेश आणि राजस्थान या ठिकाणी केली जाते. ओव्याचे आरोग्यदायी फायदे आज आपण जाणून घेऊयात.
ओव्याचे आरोग्यदायी फायदे –
१. एक ग्लास पाण्यात एक चमचा ओवा रात्रभर भिजवून ठेवला आणि सकाळी हे पाणी उकळून त्यात मध टाकून पिल्यास भूक नियंत्रित राहते आणि लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते.
२. संधिवातासाठी ओव्याची पुरचुंडी टार्या करून वेदना होत असणाऱ्या भागावर त्याचा शेक द्यावा. तसेच अर्ध्या कप पाण्यात ओवा उकळून त्यात सुंठ मिसळून त्याचे सेवन करावे त्याने संधिवातात खूप आराम मिळेल.
३. अकाली केस पांढरे होत असेल तर एक ग्लास पाण्यात एक चमचा कडीपत्ता , मनुका , साखर आणि ओवा घालनून त्याचा काढा तयार घ्यावा आणि त्याचे सेवन रोज केल्यास तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
४. चेहऱ्यावर मुरूम येत असतील तर पाण्यात थोडा ओवा मिसळून त्याची पेस्ट बनवून मुरुमाच्या जागी १० ते १५ मिनिटे ठेवावीत. त्वचेच्या आत अडकलेली धूळ आणि मुरूम मुक्त होण्यास मदत होईल.
५. अपचन , गॅस आणि पोटदुखी होत असेल तर ओव्याबरोबर चिमूटभर हिंग आणि काळे मीठ सेवन करावेत.
६. हिरड्यांना सूज आली असेल तर ओव्याच्या तेलाचे काही थेंब पाण्यात टाकून त्याने गुळण्या कराव्यात.
७. सर्दी झाली असेल तर नाकातील बंद पडलेल्या नासासाठी एका डब्बीत किंवा रुमालामध्ये ओव्याची पूड घ्यावी आणि त्याचा सुगंध दिवसातून ४ ते ५ वेळा घ्यावा.
अश्या मूर्ती लहान आणि कीर्ती महान ओव्याचे रोजच्या आहारात सेवन करून तुम्ही निरोगी राहू शकता.