“मागेल त्याला शेततळे योजना”… आपण लाभ घेतला आहे का ?
आज आपण “मागेल त्याला शेततळे” या शासकीय योजनेबद्दल जाणून घेणार आहोत.
शेतीसाठी पाणी हा आवश्यक घटक आहेच पण तो सर्वच शेतकऱ्यांना उपलब्ध होऊ शकत नाही. दुर्गम व डोंगराळ भागात कित्येक ठिकाणी शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागते. विहिरींवरदेखील ताण पडू लागतो. परिणामी उत्पादनात घट होते.
या सर्वच गोष्टींवर उपाय म्हणून सरकारने शेतकऱ्यांसाठी “मागेल त्याला शेततळे” ही योजना आणली आहे.
पाण्याची टंचाई असणाऱ्या भागांमधील लाभार्थी शेतकरी या सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या या योजनेचा लाभ घेत आहेत.
जाणून घ्या योजनेच्या मुख्य अटी:-
- लाभार्थी शेतकऱ्याच्या नावावर कमीत कमी 0.60 हेक्टर जमीन असावी.
- शेतकऱ्यांची जमीन शेततळे बांधण्यासाठी सुयोग्य व अनुकूल असावी ज्यामुळे पावसाच्या पाण्याने सुद्धा शेततळे भरले जाईल.
- सदरील शेतकऱ्याने मागील काळात, “सामाजिक शेततळे” किंवा “भात खाचरातून तयार होणारी बोडी” यांचा, लाभ शासकीय योजनांतून घेतलेला नसावा.
अत्यावश्यक कागदपत्रे:-
1) जमिनीचा 7/12 खाते उतारा.
2) 8 “अ” चा उतारा.
3) दारिद्र्य रेषेखालील कार्ड.
या मध्ये शेततळ्याचे अनुदान हे 50 हजार रुपयांपर्यंत शेतकऱ्यांना मिळते. यासाठीचा अर्ज हा शेतकऱ्यांनी तालुक्यातील “कृषी कार्यालयात” जाऊन भरावा आणि त्यापुढील प्रक्रियेनंतर शेतकऱ्यांना “मागेल त्याला शेततळे” या योजनेचा लाभ घेता येईल.
ब्युरो रिपोर्ट – किसानराज डेस्क