कोकम लागवड कशी आहे फायदेशीर
कोकण प्रदेश निसर्गाने समृध्द आहे. प्रत्येक ऋतूत विविध फळे, भाज्या, फुले मुबलक प्रमाणात होतात.कोकम हे कोकणातील प्रमुख पिकांपैकी एक आहे. कोकमासाठी येथील हवामान आणि जमीन पोषक असून कोकमाच्या बागायती उभ्या राहू लागल्या आहेत. यामुळे नगदी पीक म्हणून हे पीक वेगाने पुढे येत आहे.कोकमाच्या फळापासून विविध प्रकारे व्यावसायिक उत्पादन घेतले जाते. कोकमापासूनही प्रक्रिया केलेल्या पदार्थानाही बाजारात चांगला भाव मिळत आहे. या दृष्टीने भविष्यात कोकणात कोकमाची उलाढाल मोठय़ा प्रमाणात वाढणार आहे. यासाठी शेतक-यांनी आतापासूनच तयारी करणे आवश्यक आहे.
कोकम लागवड फायदे –
१. लागवड योग्य पडीक जमिन लागवडीखाली येईल.
२. फळप्रक्रिया उदयोगास चालना मिळून नविन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
३. कृषी उत्पन्न वाढल्याने विकासास चालना मिळेल.
कोकम लागवड –
१. लागवड करताना सुधारित जातींची योग्य प्रकारे लागवड आणि निगा राखल्यास यातून शेतक-यांना चांगले उत्पन्न मिळू शकते.
२. कोकम फळासाठी उष्ण दमट हवामान व पाण्याचा चांगला निचरा होणारी जमिन लागते.
३. कोकमाची लागवड पावसाच्या सुरवातीला करावी लागते.
४. लागवड केल्यावर पहिली दोन वर्षे उन्हाळा व हिवाळयात आठवड्यातून एकदा पाणी द्यावे लागते.
५. कोकमाची लागवड साधारण मे महिन्यामध्ये करावी. ६-६ मीटर अंतरावर ६०बाय ६० सेंमी आकाराचे खड्डे खणून त्यात कोकमाच्या रोपांची लागवड करावी.
६. पावसाळय़ापूर्वी अर्धवट कुजलेले शेणखत, माती, सिंगल सुपर फॉस्फेट मिक्स करून घ्यावे.
७. पावसाच्या सुरुवातीला एक वर्षाचे निरोगी जोमदार झाड लावावे.
८. पहिल्या वर्षी उन्हापासून संरक्षण होण्यासाठी आच्छादन करावे.
९. कलमाच्या जोडाखाली खुंटावरील फू ट काढून टाकावी आणि तणांचे नियंत्रण करावे.
१०. कलमे लावल्यानंतर ताबडतोब त्याला काठीचा आधार दयावा. आधार देवून सरळ वाढू दिल्याने कलम उभे सरळ वाढते, लवकर उत्पन्न देते आणि रोपांपेक्षा लवकर उत्पन्न मिळू शकते.
११. कलमाच्या जोडाखाली पहिली दोन वर्षे वारंवार फुटवा वाढतो. तो काढून टाकावा अन्यथा फुटवा वाढून कलम मरण्याची शक्यता असते.
१२. लागवडीच्या पहिल्या वर्षी कडक उन्हापासून संरक्षण करण्यासाठी कलमे अगर रोपाना सावली करावी.
१३. बागेमध्ये साधारणतः १० टक्के नर झाडे लावावीत.
१४. लागवडीनंतर प्रत्येक झाडास पहिली किमान दोन वर्षे १० लिटर प्रती दिनी ठिबक सिंचनाव्दारे पाणी दयावे.
सुधारित जाती –
१. डॉ. बा.सा.कोंकण कृषी विद्यापीठाने ही मादी प्रकारची जात विकसीत केली आहे.
२. पुर्ण वाढलेल्या झाडापासून १४० किलो फळे प्रती वर्षी मिळतात. फळे मध्यम आकाराची, जाड सालीची आणि आकर्षक लाल रंगाची असतात.
३. फळे पावसाळयापूर्वी पिकतात त्यामुळे फळांचे नुकसान होत नाही.
४. डॉ. बा. सा. कोंकण कृषी विद्यापीठाने ही मादी प्रकारची जात विकसीत केली आहे.
५. पुर्ण वाढलेल्या झाडापासून १५० किलो फळे प्रती वर्षी मिळतात. या जातीची फळे मोठी, जाड सालीची आणि गर्द लाल रंगाची असतात.
६. मोठया आकाराच्या फळामुळे या जातीची मागणी जास्त आहे.
खते –
१. कोकमापासून अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी पहिल्या वर्षापासून खते देणे आवश्यक आहे. खते ऑगस्ट – सप्टेंबरमध्ये दयावीत.
२. खताची मात्रा पहिल्या वर्षांपासून त्याचप्रमाणात १० वर्षापर्यंत वाढवावी आणि १० व्या वर्षी आणि पुढे तीच कायम ठेवावी. खताची मात्रा खालीलप्रमाणे असावीत.
वर्ष शेणखत / नत्र स्फुरद
१ ले २ किलो / १०० ग्रॅम १५० ग्रॅम
१० वे २० किलो / १ किलो १.५ किलो
काढणी आणि उत्पन्न –
१. कोकमामध्ये फळधारणा ५ व्या वर्षापासून सुरू होते. ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये फुले लागतात आणि मार्च ते मे मध्ये फळे तोडणीस तयार होतात.
२. हिरव्या रंगाची फळे फोडून वाळवतात त्यांचा उपयोग मोठया प्रमाणात अन्नपदार्थ साठविण्यासाठी आणि आंबटपणा आणण्यासाठी करतात.
३. फळे पिकल्यावर गर्द लाल किंवा काळसर लाल रंगाची होतात. त्यांचा उपयोग आमसुले (वाळवलेली रस लावलेली कोकम साल) कोकम आगळ (मीठाचा वापर करून साठवलेला रस) आणि अमृत कोकम (कोकम सरबत) इत्यादीसाठी केला जातो.
४. कोकमाच्या बियांमध्ये घनस्वरूपात असलेले तेल असते त्याला कोकम बटर असे म्हणतात.
५. कोकम बटरचा उपयोग सौंदर्य प्रसादने तसेच औषधांमध्ये, क्रिममध्ये केला जातो.
६. पुर्ण वाढलेल्या कोकम झाडापासून १४० ते १५० किलो फळे मिळतात.
कोकम झाडाची घ्यावयाची काळजी –
१. कोकम झाडाचे वय वाढते तसे उत्पन्न वाढते. त्यामुळे त्याला नियमीत खताची मात्रा दयावी.
२. खत दिल्यामुळे फळे नियीमत मिळतात, फळांचा दर्जा चांगला राहतो.
३. झाडाला भरपूर सुर्यप्रकाश मिळेल याची काळजी घ्यावी. त्याच्यावर सावली करणारी आजूबाजूची झाडे कमी केल्यास फळधारणा वाढते, फळे आकाराने मोठी होतात.
४. कोकमाच्या झाडावरील मेलेल्या फांदया कमकुवत फांदया कापून नष्ट कराव्यात. मात्र कोकमामध्ये जमिनीकडे वाढणाऱ्या (जिओट्रोपिक) फांदयावर फुले आणि फळे लागतात अशा फांदया तोडू नयेत.
कोकम पासून अनेक विविध प्रकारचे पदार्थ बनतात त्यामुळे बाजारात याची मागणी भरुपुर आहे . तुम्ही जर कोकम ची शेती करत असाल तर तुम्हाला नक्कीच याचा भरघोस नफा होईल.