जनावरांचे लसीकरण का करायला हवे ?
बदलत्या वातावरणामुळे जनावरे आजारी पडतात. पावसाळ्यामध्ये जनावरांना संसर्गजन्य रोग होण्याची शक्यता असते.काही आजारामुळे जनावरे दगावतात. संसर्गजन्य किंवा साथीच्या रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती आधीच निर्माण करण्यासाठी लसीकरण करणे महत्वाचे आहे.
लसीकरण करताना घ्यावयाची काळजी-
१. रोगप्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी आपल्या जनावरांना योग्य असा पोषक आहार म्हणजेच क्षार व खनिजे यांचे मिश्रण द्यावे.
२. लसीकरण करण्यापूर्वी एक आठवडा अगोदर जंतनाशक औषध द्यावे.
३. लसीकरण करण्यापूर्वी बाह्य परजीवी यांचे निर्मूलन करावे.
४. लसीकरणानंतर जनावरांना अतिशय कष्टाची कामे करू देऊ नयेत. त्यांना थकवा येईल अशी कामे लावू नयेत.
चांगल्या कंपनीची नामांकित लसच द्यावी
५. लस ही योग्य तापमानाला व योग्य अवस्थेत साठवावी तसेच लसीची वाहतूक करताना योग्य प्रकारे करावी.
६. गाभण जनावरांना लस टोचू नये.
७. लस देताना लसीची मात्रा व देण्याची पद्धत तंतोतंत पाळावी.
८. सर्व जनावरांना एकाच वेळी लस द्यावी
९. लसीकरण हे नेहमी दिवसाच्या थंड वेळेतच म्हणजेच सकाळी किंवा संध्याकाळी करावे.
१०. दोन वेगळ्या लसी एकत्र करून कधीही देऊ नये.
११. लस टोचलेल्या जागी कोणत्याही जंतु नाशकाचा वापर करू नये.
१२. लस पूर्णपणे बर्फातच ठेवावी जेणेकरून तिची कार्यक्षमता कमी होणार नाही.
१३. शिल्लक राहिलेली लस वापरू नये.
१४. लसीचा तपशील म्हणजे स्त्रोत प्रकार बॅच नंबर इत्यादींची योग्य प्रकारे नोंद ठेवावी.
लसीकरणानंतरची लक्षणे –
१. लसीकरणानंतर लगेच काहीही विचित्र वाटले असता त्वरित पशुवैद्यकाशी संपर्क साधावा.
२. लस पोचल्याच्या जागी सूज येणे, गरम लागणे दुखणे इत्यादी घटसर्प किंवा पर्याची लस टोचल्यावर दिसू शकतात.
३. काही वेळेस ताप येणे, भूक मंदावणे, थकवा येणे आणि दुभत्या जनावरांचे दूध उत्पादन घटने इत्यादी लक्षणे देखील दिसू शकतात.
लसीकरणानंतर घ्यावयाची काळजी-
१. लसीकरणानंतर सुया व सिरींज एक तास उकळत्या पाण्यात ठेवाव्यात.
२. काळपुळी व ब्रुसेला सांसर्गिक गर्भपात या रोगांच्या लसी फार काळजीपूर्वक हाताळावे लागतात कारण त्यांच्या पासून संसर्ग होण्याचा धोका असू शकतो.
गायी म्हशींना कधी करावे लसीकरण-
१. आंत्रविषार – मे जून महिन्यात.
२. घटसर्प (गळसुजी)- दरवर्षी मे जून महिन्यात पावसाळ्यापूर्वी.
३. एक टांग्या/ फऱ्या -दरवर्षी मे जून महिन्यात पावसाळ्यापूर्वी.
४. तोंडखुरी -दरवर्षी मार्च एप्रिल व नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात.
५.पी पी आर -मे जून किंवा नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात.