या पद्धतीने लागवड करा आद्रक मिळेल फायदाच फायदा ….
आपल्या रोजच्या जेवणातील मसाल्यामध्ये एक महत्वाचा घटक म्हणजे आद्रक. ओल्या आद्रकाला आले म्हणतात आणि प्रक्रिया करून वाळविलेल्या आद्रकाला सुंठ म्हणतात. जमिनीमध्ये असणाऱ्या आद्रकाच्या खोडाचा उपयोग मसाल्यासाठी करतात. आद्रक हे दमट आणि उष्ण हवामानात चांगले येते.
कोकण भागात किंवा जास्त पावसाच्या प्रदेशात फक्त पावसाच्या पाण्यावर सुद्धा आद्रकाचे पीक घेतले जाते. आद्रकासाठी पाण्याचा निचरा होणारी जमीन फायदेशीर असते. नदीकाठच्या गाळ असणाऱ्या पोयटा जमिनीत आद्रक चांगले येते. एकाच जमिनीत वारंवार आद्रक घेतले तर त्याच्यावर पडणाऱ्या रोगाचे नियंत्रण करणे अवघड जाते. आद्रकाच्या लागवडीपूर्वी जमिनीची चांगली मशागत करणे गरजेचे असते. जमीन ३०-४० से.मी.खोल उभी आडवी नांगरून घ्यावी. ३-४ कुळवाच्या पाळ्या देऊन माती भूशभुशीत करून घ्यावी. आद्रकाच्या पिकाच्या लागवडीसाठी जमिनीची आखणी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. हलक्या जमिनीत सपाट वाफे पध्दत, तर मध्यम आणि भारी जमिनीत सऱ्यावरंबे पध्दत वापरतात. जमिनीत हेक्टरी सुमारे ४० गाड्या शेणखत टाकावे.
महाराष्ट्रातील काळ्या जमिनीत रुंद वरंब्याची पध्दत फायदेशीर ठरते. सपाट वाफे 3 X 2 मीटर आकाराचे करून घ्यावे. दोन वरंब्यात ६० से. मी. अंतर ठेवावे तर गादी वाफ्यावर लागवड करताना 3 X १ मीटर आकाराच्या १५-२० से.मी. उंच वाफ्यावर लागवड करावी. चांगल्या प्रतीचे निरोगी ३-५ से.मी. लांबी आणि वजनाला अंदाजे २०-२५ ग्रॅम असे बियाणे निवडावे. एक हेक्टर लागवडीस साधारणपणे १५०० ते २००० किलो बियाणे लागते. बियाणे ४-५ से. मी. खोल लावून मातीने झाकावे. लागण कोरडीत करून हलके पाणी सोडून वाफे भिजवावे.
आद्रक हे कीड - रोगाला नाजूक असल्याने कंद लागवडीच्या वेळी काळजी म्हणून डायथेन-झेड-७८ आणि नुवाक्रॉन अनुक्रमे २५० ग्रॅम आणि १०० मि.ली., १०० लीटर पाण्याच्या मिश्रणात बुडवून लावावेत.मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आद्रकाची लागवड करतात. लागवडीनंतर १५ – २० दिवसात कोंब जमिनीच्या वर दिसू लागतात. त्यानंतर लगेच कोंबाना धक्का न लागू देता वाफ्यातील तण काढून घ्यावे. वेळोवेळी हात खुरपणी करून तण काढावे. पीक जेंव्हा १२० दिवसाचे होईल, तेंव्हा हलकी खोदणी करून दुसरा वरखताचा हप्ता द्यावा.
आद्रकाचे पिक ७ महिन्यात तयार होते, आणि आद्रक जर सुंठीकरता लावले असेल तर ८ ते ९ महिन्यात पीक तयार होते. जानेवारी महिन्यात पाने पिवळी पडून वाळू लागतात. वाळलेला पाला कापून, पाला पाचोळा वेचून घ्यावा. कुदळीने खोदून आद्रकाची काढणी करावी. हेक्टरी उत्पादन १०-१५ टनापर्यंत येऊ शकते. काढण्याच्या वेळी चांगला भाव नसेल तर आले न काढता त्यास दर १० दिवसांनी पाणी देणे चालु ठेवावे. आणि त्याला वाढ व पोषणासाठी आधीच्या पोषणाइतकीच खते द्यावीत. या पिकाचे उत्पादन हेक्टरी ३० ते ४० टनापर्यंत होते.
पाणी :-
लागण होताच एक हलके पाणी द्यावे. पावसाचा अंदाज लक्षात घेऊन दर ६ ते ८ दिवसांनी पिकास पाणी द्यावे. पिकात पाणी साचून राहू देऊ नये.
अधिकची खते :-
लावणीच्या वेळी १०० किलो अमोनिअम सल्फेट, ३०० किलो सुपर फॉस्फेट आणि ८० किलो म्युरेट व पोटॅश वाफ्यात टाकावे. ६ ते ८ आठवड्यांनंतर ५० किलो आणि १२० दिवसांनी १०० किलो युरिया द्यावा.
कीड :-
खोडमाशी :- खोडमाशी ही रोपाच्या खोडावर उपद्रव करते. या माशीच्या नियंत्रणासाठी १०० मि.ली. कोणतेही कीटकनाशक १०० लीटर पाण्यात मिसळून फवारावे.
कंदमाशी :- कंदमाशी या माशीच्या नियंत्रणासाठी १० दाणेदार फोरेट, हेक्टरी 20 किलो टाकावे.
उन्नी-हुमणी :- या किडीच्या प्रादुर्भावापासून बचावासाठी जमिनीत आद्रक लावताच १० टक्के बी.एच.सी. ५० किलो हेक्टरी एवढे प्रमाण खताबरोबर मिसळावे. त्यासोबतच बी.एच.सी. बरोबर ५०० किलो निम पेंड दिली तर कीड नियंत्रण होऊन पिकाला खतही मिळते.
रोग :-
नरम कूज :- जेंव्हा जमिनीत पाण्याचा निचरा नीट होत नाही, त्यावेळी या रोगाचा प्रादुर्भाव होतो. शेंड्याकडून झाड वाळत जाते. बुंध्याच्या भाग सडू लागतो.
उपाय :-
• रोगट झाडे मुळासकट उपटून टाकावी.
• पिकाचा फेरपालट, उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीत लागवड अत्यावश्यक.
अशाप्रकारे खरिपाच्या हंगामात आपण आद्रकाची लागवड करू शकतो. या आद्रकाचे योग्य नियोजन आणि देखरेख केली तर ही आद्रक लागवड दर्जेदार उत्पादन आणि भरघोस उत्पन्न देते.
व्हिडिओ स्वरूपात पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा
ब्युरो रिपोर्ट – किसानराज डेस्क