खाद्यतेलाच्या किंमती अधिक वाढण्याची शक्यता, पाम तेलाला मिळतोय शेंगदाणा तेलाचा भाव
देशभरात वाढत्या महागाईने थैमान घातले आहे. आपल्या दररोजच्या वापरात आवश्यक असणाऱ्या जवळ जवळ सर्वच गोष्टींचे दर वाढले आहेत. त्यात खाद्यतेलाचे दर तर विचारूच नका. ते तर दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
एके काळी पाम तेल हे २० ते २५ रुपये लिटर प्रमाणे मिळत होते. तर शेंगदाणे तेल सर्वात महागड्या तेलांपैकी एक होते. मात्र आता सर्व चित्रच बदलेले दिसत आहे. सूर्यफूल तेल आणि सोयाबीन तेलाच्या दराने शेंगदाणा तेलाच्या दराला मागे टाकले आहे.
बाजारामधील सर्व शेतमालाच्या किमतींमध्ये उलटपालट झाली आहे याचे मुख्य कारण म्हणजे रशिया-युक्रेन मध्ये होत असलेले युद्ध .
मागील १० ते १२ दिवसांपासून खाद्यतेलाच्या किमतींमध्ये वाढ होतांना दिसून येत आहे. देशामध्ये सूर्याफुल, सोयाबीन, पाम तेल यांची निर्यात होत असते तर धुळे, नाशिक, गुजरात , सटाणा येथून भुईमूग विक्रीसाठी उपलब्ध होते.
सर्वात उच्च प्रतीचे तेल म्हणजे शेंगदाणा आणि करडी तेल तर हलक्या प्रतीचे तेल म्हणजे पाम, सोयाबीन, सरकी. जे गेल्या ४० वर्षात घडले नाही असे काही आता घडले आहे.
तेलाच्या किमतींमध्ये काय झाले बदल ?
रशिया – युक्रेन युद्ध सुरु झाल्यापासून तेलाच्या आयातीवर तसेच निर्यातीवर काही निर्बंध लावण्यात आले आहे.
शेंगदाणा तेल १० रुपयांनी उतरले तर सूर्यफूल तेल १० रुपयांनी वधारले. सरकी, सोयाबीन तेल ९ रुपयांनी, पामतेल १० रुपयांनी वाढल्यामुळे ग्राहक शेंगदाणा तेलाकडे वळला आहे.
बाजारामध्ये करडी तेलाची आवक कमी झाली असून भावामध्ये वाढ झाली आहे. करडीच्या तेलाचे दर हे २३० रुपये लिटर वर जाऊन पोहचले असून सध्या सर्वात महागडे तेल म्हणून या तेलाची ओळख होत आहे.
पाम तेलाची १५५ ते १६० रुपये तर सूर्यफूलाची १८० रुपयांनी खरेदी होत आहे. खाद्यतेलाच्या किमतींमध्ये अजून किती वाढ होईल हे सांगता येत नाही.