पशुधन

दिवसाला १६ लिटर दुध देणारी म्हैस | मालकाला कमावून देते वर्षाला ३ लाख रुपये |

Shares

दूध व्यवसाय करायचा म्हणल्यावर बऱ्याच गोष्टींचा विचार आपण करतो. अगदी म्हशींची जात कुठली निवडावी याबाबत बरीच माहिती गोळा करतो.

यासाठीच आज आपण एका अशा जातीच्या म्हशीची माहिती घेणार आहोत जी दूध व्यवसायासाठी खूप फायदेशीर आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने म्हशींच्या मराठवाडी, पंढरपुरी आणि नागपूरी या तीन जाती आढळतात. यामध्ये पंढरपुरी ही जात ही काटक आणि दुधासाठी चांगली समजली जाते. या जातीच्या म्हशीला धारवाडी सुद्धा म्हणले जाते. पंढरपूर वरून या म्हशींचे नाव पंढरपुरी असे पडल्याचे म्हणले जाते. कमी पावसाच्या प्रदेशात या म्हशींचे पालन चांगले होत असते. पंढरपुरी ही म्हशीची जात सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, बेळगाव या ठिकाणी आढळते. या म्हशी मध्यम आकाराच्या असतात. यांचा चेहरा लांब आणि निमुळता असतो. विशेष म्हणजे या म्हशींची शिंगे 45 ते 50 सेंटीमीटर पर्यंत वाढलेली आणि अगदी खांद्यापर्यंत आलेली असतात. लंबुळकी-पिळदार शिंगे आणि त्यांच्या शरीराच्या ठेवणीमुळे या म्हशी देशभरात प्रसिद्ध आहे


लवकर वयात येणाऱ्या पारड्या, कमी भाकड काळ, पहिल्या वेताच्या वेळी कमी वय, उत्तम प्रजनन ही या म्हशींची वैशिष्ट्ये आहेत. जास्त उत्पादन क्षमतेमुळे म्हैस बाकीच्या जनावरांपेक्षा फायद्याची ठरते. तिच्या दुधामध्ये स्निग्धाचे प्रमाण जास्त असते. तूस, कुठार यांसारख्या शेतातल्या उरलेल्या अवशेषांवर प्रक्रिया करून चांगल्या प्रकारचे खाद्य बनवून म्हशींना देता येते.


दुग्ध व्यवसाय साठी उपयुक्त असणारी ही पंढरपुरी म्हैस हलक्या आणि निकृष्ट चाऱ्यावर सुद्धा तग धरून राहते. प्रतिकूल वातावरणात सुद्धा ही जात चांगले दूध देते. ही म्हैस सुमारे सहा ते सात लिटर दूध देते. व्यवस्थित काळजी घेतल्या गेली तर या जातीच्या म्हशी पंधरा लिटरपर्यंत सुद्धा दूध देतात. एका वेतात या म्हशी पंधराशे ते अठराशे लिटर दूध देतात. दूध उत्पादन क्षमता आणि सातत्य या गुणांमुळे ही जात दुधासाठी चांगली आहे. या म्हशींचे वजन साधारण साडेचारशे किलो एवढे असते.प्रजननक्षमते साठी प्रसिद्ध असणाऱ्या या म्हशीच्या पारड्या वयाच्या 25 ते 30 महिन्यांत गाभण राहतात. 35 ते 40 महिन्यांत पहिल्यांदा वितात. दर 12 ते 13 महिन्यात या जातीच्या म्हशी एका पारड्याला जन्म देतात. बाकी सर्व देखरेख आणि सांभाळ हा इतर जनावरांसारखाच असल्याने विशेष असे लक्ष या म्हशींना द्यावे लागत नाही.
लवकर गाभण राहणे, कमी भाकड काळ आणि चांगली प्रजनन क्षमता असणाऱ्या ह्या पंढरपुरी म्हशी म्हणजे दूध व्यवसायात फायदाच फायदा.

ब्युरो रिपोर्ट – किसानराज डेस्क

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *