दूध पेटू लागल्याने सामान्यांचे जीवन हैराण !
कोरोनाचा कहर वाढत असल्यामुळे त्यावर उपाय म्हणून अनेक राज्यांमध्ये पुन्हा लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारला आहे. या गंभीर परिस्थितीमध्ये सामान्यांचे जीवन हैराण झालेले आहे. असे असताना पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस, खाद्यतेल यांचे भाव आभाळाला भिडत आहे. ह्यात भर म्हणजे आता दुधाच्या किंमतीत सुद्धा वाढ होत आहे. आता देशातील सर्व राज्यांमध्ये दुधाचे नवे दर लागू होत आहेत. उत्पादनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या अमूलच्या सर्व उत्पादनांच्या किमतीत सुद्धा साधारणतः २ रुपयांनी वाढ होत आहे. यामुळे आता अमूल गोल्डचे दर 58 रुपये प्रति लिटरपर्यंत गेले आहेत. देशात आतापासून दिल्ली, गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम बंगालसह इतर बहुतांश राज्यांमध्ये दुधाचे नवे दर लागू होत आहेत. कोरोनाच्या भीषण परिस्थितीत सर्वसामान्यांचे जीवन कठीण झाले असताना पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस, खाद्यतेलासोबतच आता दुधाचे भाव वाढल्याने सामान्यांनी जगावे कसे असा जाब विचारला जातोय.
ब्युरो रिपोर्ट – किसनराज डेस्क