कांदा पिकात एकात्मिक पीक पद्धतीचा अवलंब आवश्यक -डॉ. झाडे
राष्ट्रीय किसान दिवस-२०२१ निमित्त वनामकृवि, परभणी कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड,औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे चिंचोली बु. ता.फुलंब्री येथे शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी केव्हीके चे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ.झाडे बोलत होते.यावेळी डॉ.झाडे म्हणाले की, कांदा पिकाच्या लागवडीपासूनच सर्व एकात्मिक पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे. लागवड करताना रोपावस्थेत बुरशीनाशक, किटनाशक आणि जिवाणू यांची प्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच खते आणि पाणी यांचा अतिरिक्त वापर टाळावा. मुख्य अन्नद्रव्यांसोबतच सूक्ष्म अन्नद्रव्य देखील कांदा पिकास देणे अत्यंत आवश्यक आहे. कांदा बीजोत्पादन घेताना मधमाश्यांची संख्या वाढवण्यासाठी कांदा पिकाच्या भोवताली झेंडू, गलांडा इत्यादी पिवळ्या रंगांची फुले लावणे आवश्यक आहे. तसेच किडीच्या प्राथमिक अवस्थे मध्येच वेळेवर व योग्य नियंत्रण करणे आवश्यक आहे. कांदा पिकात रस शोषण करण्याऱ्या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. यासाठी शेतकरी बांधवांनी कांदा पिकाच्या लागवडी सोबतच शेतात एकरी २५ -३० पिवळे व निळे चिकट सापळे लावावेत. आणि सुरुवातीपासूनच निंबोळी अर्क फवारणीसाठी वापरावे. तसेच कांदा सड च्या नियंत्रणासाठी लागवडीच्या वेळेसच रोपे बुरशीनाशकाच्या द्रावणात बुडवून लावावीत. तसेच सडीच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीचा प्रभावी वापर करावा.
या कार्यक्रमासाठी झुआरी केमिकल्स चे विभागीय व्यवस्थापक श्री.राजेंद्र डावकर, केव्हीके चे विषय विशेषज्ञ डॉ.बस्वराज पिसुरे, झुआरी चे श्री.तुषार शिंद्रे, गावचे उपसरपंच श्री.लक्ष्मण मते यासोबतच गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी बोलताना डॉ.पिसुरे म्हणाले की, केंद्र सरकार मार्फत शेतकरी बांधवांसाठी किसान सारथी सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांसाठी 18001232175 आणि 14426 हे टोलफ्री क्रमांक देण्यात आलेले आहेत. तरी शेतकरी बांधव या नंबरवर फोन करून शेती संदर्भातील आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवू शकतील. तरी यासाठी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी यावर आपली नावनोंदणी करावी. याचबरोबर केव्हीके मार्फत तयार करण्यात येणाऱ्या कृषि हवामान सल्ला पत्रिकेबदहली त्यांनी माहिती दिली.
यानंतर शेतकऱ्यांच्या कांदा पिकाच्या प्रक्षेत्राला भेट देऊन सद्य परिस्थितीतील व्यवस्थापणाबद्दल माहिती देण्यात आली.