होळीच्या पूर्वसंध्येला शेतकऱ्यांसाठी खुशखबर, दुधाच्या दरात वाढ !
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली असल्याने त्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. इंधन दरवाढीमुळे जनता महागाईने होरपळली आहे. त्यातच आता दूध खरेदी करणंही महागलं आहे. कारण, राज्यभरात दूध खरेदी आणि विक्रीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय दूध उत्पादक संघाने घेतला आहे.
कोरोना काळात दुग्ध व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले होते. त्यात एकीकडे दुधाच्या दरात थोडीही वाढ झाली नव्हती तर दुसरीकडे पशु खाद्यांचे दर हे महिन्याकाठी वाढत होते.
मात्र आता २ वर्षांनंतर दुधाच्या दरात वाढ झाली असून शेतकरी आता आनंदात आहेत. मागील २ वर्षांपासून दुधाच्या मागणीत घट झाली होती. आता मात्र कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे बाजारामध्ये दूध, लोणी आदींची मागणी वाढत आहे.
दूध विक्री दराचा निर्णय घेण्यासाठी राज्यातील खासगी तसेच सहकारी संघाची कात्रज येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.
या बैठकीत सोनाई, महानंद, गोवर्धन, गोविंद,ऊर्जा, चितळे, राजहंस, अनंत, सुयोग, कातरज, आदी सहकारी आणि खाजगी दुग्धव्यवसायिकांचे ४७ प्रतिनिधी उपस्थित होते.
दुधाच्या दरात ३ रुपायांनी वाढ
या बैठकीमध्ये दूध खरेदी दरात ३ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. दुध खरेदी दरात वाढ झाल्यामुळे विक्री दर वाढवण्यावर विचार करण्यात आला. मात्र ग्राहकांवरील दरवाढीचा बोझा कमी व्हावा म्हणून प्रति लिटर २ रुपयांची वाढ केली.
दुधाचे दर हे २८ रुपये लिटर असे होते तर आता या दरात वाढ होऊन हे दर आता ३१ ते ३२ रुपये लिटर झाले आहे. त्यामुळे शेतकरी आता आनंदात असला तरी अजूनही त्यांना पशुखाद्याच्या वाढत्या किमतींमुळे काही प्रश्न कायम आहेत.
दुधाच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय
गेल्या काही दिवसांत झालेली इंधन दरवाढ, पशुखाद्याच्या दरात झालेली वाढ, दूध उत्पादनात झालेली घट, दूध पावडर आणि बटर यांच्या दरात झालेली वाढ या सर्वांमुळे दुधाच्या दरात वाढ करण्यात आली आहे.
राज्यातील सहकारी आणि खाजगी दूध व्यावसायिकांच्या उत्पादक आणि प्रक्रिया कल्याणकारी संघाची बैठक पार पडली. या बैठकीत दूध दरात वाढीचा निर्णय घेण्यात आला आहे.
दुधाच्या पदार्थामध्ये देखील वाढ
दुधाच्या दरात २ रुपायांनीं वाढ झाली असून दूध पावडर चे दर १८० रुपयांवरून २७० रुपये किलो तर लोणीपासून तयार होणाऱ्या बटर चे दर २४० वरून ३५० रुपये किलो वर पोचले आहे. यामुळे गाईंच्या दरात देखील वाढ झाली आहे.