२ माजी सैनिकांना सलाम, पारंपरिक पिकांना फाटा देत केला नवीन प्रयोग
सध्या अनेक युवकांचा कल शेतीकडे वळत असून कोरोनाकाळात त्यांनी नवनवीन पीक घेऊन काही प्रयोग केले आहेत. तर आता अहमदनगर जिल्ह्यामध्ये २ माजी सैनिकांनी पारंपरिक शेतीला फाटा देत जिरेनियमची शेती केली आहे.
जिरेनियम च्या शेतीमधून त्यांना वर्षाकाठी लाखोंचा फायदा मिळत आहे. महेंद्रसिंग चव्हाण आणि गोपीनाथ डोंगरे असे त्या २ माजी सैनिक शेतकऱ्यांचे नाव आहे.
या दोघांनी देशसेवा केल्यांनतर शेती करण्यास सुरुवात केली असून सुरुवातीला त्यांनी गहू, ज्वारी, कांदा अश्या पिकांची लागवड केली मात्र यामधून अपेक्षेप्रमाणे उत्पन्न मिळत नसल्यामुळे त्यांनी कृषी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन जिरेनियमचे पीक घेण्याचे ठरवले.
त्यांनी एका एकरात १० हजार रोपांची लागवड केली त्यातून त्यांना १ टन जिरेनियम पासून १ लिटर तेल मिळत असून त्यास बाजारामध्ये जवळपास १२ हजार रुपये असा दर मिळत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
३ महिन्यात सव्वा लाख …
जिरेनियम च्या तेलाची विक्री करता त्यांना प्रति लिटर मागे १२ हजार रुपयांच्या आसपास दर मिळत आहे. त्यांना ३ महिन्यामध्ये साधारणतः सव्वा लाखांचे उत्पन्न मिळत असून त्यांना पिकांची मशागत कारण्यासाठी तसेच लागवडीसाठी ७० हजार रुपयांचा खर्च आला होता.
एकदा लागवड केल्यानंतर ४ वर्षापर्यंत हे पीक घेता येते. वर्षाकाठी पिकांच्या मशागतीचा खर्च वगळता त्यांना ३ ते ४ लाखांचा नफा होणे अपेक्षित आहे. कोणतेही जनावर हे पीक खात नसल्यामुळे या पिकांची निगा राखण्याची गरज नाही.
जिरेनियमचा वापर सौंदर्यप्रसाधन बनवण्यासाठी तसेच अनेक औषधांमध्ये केला जातो. त्यामुळे बाजारामध्ये याची मोठ्या प्रमाणात मागणी असते. तसेच भारतामध्ये जिरेनियमची आयात केली जाते. तुम्ही पारंपरिक शेतीबरोबर देखील जिरेनियमची शेती करू शकता.