सोयाबीनच्या दरात वाढ, मात्र अजूनही शेतकरी संभ्रमात
खरीप हंगामात सोयाबीन उत्पादनात मोठी घट झाली होती. त्यामुळे सर्वकाही बाजारपेठेच्या दरावर अवलंबून होते. सुरुवातीपासूनच सोयाबीनच्या दरात सतत चढ उतार होत असतानाचे चित्र आपल्याला बघायला मिळाले. शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीपेक्षा सोयाबीन साठवणुकीवर जास्त भर दिला होता. त्यामुळे सोयाबीनच्या दरात थोडी वाढ झाली होती मात्र त्यानंतर पुन्हा सोयाबीनचे दर घसरले होते.आता सोयाबीनच्या अंतिम टप्यात असून साठवणुकीचा फायदा आता सोयाबीन शेतकऱ्यांना होतांना दिसत असला तरी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यंदा संपूर्ण हंगामात सोयाबीनला सरासरीप्रमाणे दर मिळालेला आहे. आता हंगाम संपत असताना सोयाबीनला किमान ७ हजारापर्यंतचा दर मिळावा ही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
बाजार समित्यांमधील दरात तफावत…
वाशिम जिल्ह्यातील कारंजा, मंगरुळपीर, मानोरा आणि रिसोडच्या बाजार समितीत सोयाबीनला सरासरी ६६५० रुपये प्रती क्विंटल दर मिळत असताना, वाशिमच्या बाजार समितीत मात्र ३०० ते ४०० रुपये कमी दराने सोयाबीनची खरेदी होत आहे.त्यामुळे शेतकरी संभ्रमात पडले आहेत. असे असले यामागे वेगवेगळी कारणे आहेत. सोयाबीनचा दर्जा, वाहतूकीचा खर्च आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कडता पध्दत यामुळे दरात तफावत असते. मात्र ही तफावत ३०० हून अधिक नसावी. असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
पुन्हा आवक मध्ये वाढ ?
सोयाबीनचा सुरवातीपासूनच संपूर्ण हंगामात दरातील चढ-उतारामुळे चर्चेत राहिला असून अजूनही त्याची चर्चा सुरूच आहे. कारण सोयाबीन हे खरीप हंगमातील मुख्य पीक असून त्याच्या उत्पादनात मोठी घट झाल्याने विक्रमी दर मिळणार अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र सोयाबीन ला ६ हजार ५०० पेक्षा अधिकचा दर मिळालेला नाही. असे असतानाही शेतकऱ्यांनी वाढीव दर मिळाला तरच विक्री अन्यथा साठवणूक हा निर्णय घेतल्याने मोठा फायदा झाला आहे. आता केवळ साठवणूकीतले सोयाबीन शेतकऱ्यांकडे असून प्रति क्विंटल ६ हजार ५०० पर्यंत सरासरीचा दर आहे. त्यामुळे आवकही वाढत आहे. आता सलग दोन दिवस बाजार समित्यांना सुट्टी राहणार आहे. त्यामुळे सोमवारी पुन्हा आवक वाढेल असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
शेतकऱ्यांपुढे आता नवीन प्रश्न …
गेल्या काही दिवसापासून सोयाबीनच्या दरात स्थिरता आहे मात्र आता सोयाबीनची विक्री करावी कुठे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे. जिल्ह्याच्या ठिकाणच्या बाजार समितीमध्येच दर कमी असल्याने शेतकऱ्यांची निराशा होत आहे. सध्या सोयाबीन हंगाम अंतिम टप्प्यात आहे. शेतकऱी साठवणूकीतले सोयाबीन विक्रीसाठी बाजारात आणत असेल तरी बाजार समित्यांमधील दरात मोठी तफावत आढळून येत असल्याने सोयाबीनची विक्री करावी की साठणूक हा प्रश्न कायम आहे. जिल्ह्यातील कारंजा, मंगरुळपीर, मानोरा आणि रिसोडच्या बाजार समितीत सोयाबीनला सरासरी ६६५० रुपये प्रती क्विंटल दर मिळत असला तरी वाशिमच्या बाजार समितीत मात्र ३०० ते ४०० रुपये कमी दराने सोयाबीनची खरेदी होत आहे.