बाराही महिने या पिकापासून मिळवा भरगोस उत्पन्न
भारतामध्ये ( India) मसाला पिकांची (Spice Crop) लागवड मोठ्या संख्येने केली जाते. या मसाला पिकांमध्ये धने, जिरे, मेथी, मिरे, बडीशेप आदी पिके प्रमुख मसाला पीक म्हणून घेतले जाते. यांपैकी बडीशेप (Fennel) महत्वाचे मसाला पीक म्हणून ओळखले जाते. बडीशेपची लागवड खरीप तसेच रब्बी दोन्ही हंगामात करता येते. बडीशेपमध्ये पोटॅशिअम, कॅल्शिअम, लोह या बरोबर फेकन, इथेनॉल, लिमोझीन आदी तेल घटक उपलब्ध असतात. यामध्ये पाचक, वेदनाशामक, अँटिऑक्सिडेन्ट, दाहक-विरोधी गुणधर्म दडलेले आहेत. आपण आज बडीशेप लागवडीबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.
हे ही वाचा ( Read This) शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत मिळणार ८०% टक्क्यापर्यंत अनुदान – कृषिमंत्री भुसे.
जमीन व हवामान –
१. बडीशेप लागवड वालुकामय जमीन सोडून बाकी सर्व प्रकारच्या जमिनीत करता येते.
२. जमिनीत सेंद्रिय पदार्थ मुबलक प्रमाणात असावेत.
३. मातीचा ph ६.६ ते ८.० इतका असावा असल्यास पीक उत्तम येते.
४. बडीशेप पिकासाठी कोरडे तसेच थंड हवामान सर्वोत्तम ठरते.
५. बियाणाची उगवण होण्यासाठी २० ते २९ अंश सेंटीग्रेड तापमान उत्तम ठरते.
६. पिकांच्या उत्तम वाढीसाठी १५ ते २० अंश सेंटीग्रेट तापमान सर्वोत्तम ठरते.
७. लागवड करण्यापूर्वी नांगरणी करावी.
८. जमीन भुसभुशीत, सपाट करून सोयीनुसार बेड तयार करून घ्यावा.
बडीशेपच्या सुधारित जाती –
१. गुजरात सौफ – १
२. गुजरात सौफ – २
३. गुजरात सौफ – ११
४. RF- १०५
५. RF- १२५
६. PF – ३५
७. CO – ११
८. NRCS SSAF – १
९. हिसार स्वरूप
पेरणी व बीजप्रक्रिया –
१. बडीशेप हे दीर्घकाळ घेतले जाणारे पीक आहे. रब्बी हंगामाच्या सुरवातीस यापिकाची पेरणी केल्यास अधिक काळ हे पीक घेता येते.
२. ऑक्टोबर महिन्यातील पहिला आठवडा या पिकाच्या पेरणीसाठी चांगला ठरतो.
३. रोपवाटिका मध्ये जुलै – ऑगस्ट महिन्यात पेरणी केली जात असून ४५ ते ६० दिवसांनी यांची लागवड केली जाते.
४. बडीशेप पिकाची लागवड डायरेक्ट तसेच रोपवाटिकेत रोप लावून देखील करता येते.
५. या बियाण्याची पेरणी करण्यापूर्वी बुरशीनाशक बाविस्टीन प्रति किलो २ ग्रॅम प्रमाणे किंवा बुरशीनाशक ट्रायकोडर्मा प्रति किलो प्रमाणे ८ ते १० ग्रॅम सह प्रक्रिया करून पेरणी करावी.
पाणी व्यवस्थापन –
१. बडीशोप लागवड करतांना त्याचे पाणी व्यवस्थापन व्यवस्थितरित्या करणे गरजेचे आहे.
२. लागवड करतांना जमिनीत पुरेसा ओलावा नसेल तर जमीन हलकी ओली करावीत.
३. वातावरणाचा अंदाज घेऊन १० ते १२ दिवसांच्या अंतराने पिकांना पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
कीड व रोग नियोजन –
१. बडीशेप पिकावर सहसा रोग तसेच किडीचा प्रादुर्भाव होत नाही. मात्र दमट वातावरण तसेच अतिशय थंडी असल्यास मावा किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.
२. मावा किडीच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट ३५ % प्रवाही १० मी. ली प्रति १० लिटर पाण्यात मिसळावेत. त्यानंतर त्याची फवारणी करावीत.
३. जास्त थंडी पडली असेल आणि दहिया रोग झाला असेल तर याच्या नियंत्रणासाठी गंधकाची भुकटी २० % तीव्रतेची २ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळावीत. त्यानंतर याची फवारणी करावी.
काढणी –
१. बडीशेपची चव त्याच्या दाण्याच्या आकारावरून ठरते.
२. बडीशेप पूर्णपणे परिपक्व होण्यापूर्वी त्याची काढणी केल्यास त्याची चव गोड तसेच स्वादिष्ट लागते.
३. पिकास फुल येणाऱ्या दिवसापासून ३० ते ४० दिवसांनी बडीशेप काढणीस तयार होते.
४. पीक पिवळे होण्यास सुरुवात झाल्यास उपरोक्त अवस्थेतील फांद्या तसेच त्यावरील अंबेल काढून त्यास सावलीत बांदल बांधून सुकवावेत.
उत्पादन –
१. शास्त्रीय पद्धतीने शेती केल्यास हेक्टरी १५ ते १७ क्विंटल पर्यंत उत्पादन मिळते.
२. लखनवी बडीशेप प्रति हेक्टरी ५ ते ७.५ क्विंटल पर्यंत उत्पादन मिळते.