पाणी वाचवा, उत्पन्न वाढवा. हरितगृहात ठिबक सिंचनाचा वापर करा !
महाराष्ट्रात अनेक शेतकरी पारंपरिक शेती पद्धतीचा वापर करतात. पारंपरिक पद्धतीत सिंचन करतांना पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. अन्नधान्याची वाढती मागणी पाहता कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल , कमी पाण्यात शेती कशी करता येईल हे एक आव्हान सध्या शेतकऱ्यांपुढे उभे आहे. यावर उपाय म्हणजे आधुनिक सिंचन पद्धत. हरितगृहात जमीन , पीक प्रकार, मुळांची वाढ, आदी गोष्टींचा विचार करून आधुनिक सिंचन पद्धतीने थोडे थोडे समप्रमाणात पाणी दिले जाते. त्या सिंचन पद्धतीस ठिबक सिंचन पद्धत असे म्हंटले जाते. हरितगृहात बहुतांश वेळा जरबेरा, गुलाब, ऑकिड लिलियम, कार्नेशन ही फुलपिके घेतली जात असून काकडी, टोमॅटो, ढोबळी मिरची यांसारखी भाजीपाला पिके घेतली जातात. फुले व भाजीपाला पिकांच्या चांगल्या उत्पादनासाठी यीग्य पाणी व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. कसे करावे पाणी व्यवस्थापन याबद्दल संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
पाणी व्यवस्थापन-
१. हरितगृहामध्ये फुले , भाजीपाला लागवड करतांना पाण्याचे उत्तम नियोजन होण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला जातो.
२. हरितगृहामध्ये माती व कोकोपीट या दोन्ही माध्यमांचा वापर केला जातो. उच्च तंत्रज्ञान पुष्प व भाजीपाला उत्पादन प्रकल्प , कृषी महाविद्यालय पुणे येथील प्रकल्पामध्ये खते व पाणी देण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा बसविण्यात आली आहे.
३. ठिबक सिंचनासाठी एक ते दीड फूट अंतरावर पिकाचे लागवड अंतर लक्षात घेऊन ड्रीपर लावले जातात.
४. ड्रीपरचा प्रवाह २ ते ४ लिटर ताशी इतका असतो.
५. पिकांसाठी साधारणता २ ते ४ लिटर प्रति चौ. मी. इतके पाणी दररोज हंगामानुसार व आवश्यकतेनुसार दिले जाते.
६. कोकोपीटमध्ये लागवड केली असल्यास तशी ८ लिटर प्रवाह असलेल्या ड्रीपरला ४ मायक्रोट्यूब जोडून त्यास ४ पेग लावून ४ झाडास पाणी देण्याची व्यवस्था केली जाते.
ठिबक सिंचनाचे फायदे –
१. ठिबक सिंचनाचा वापर केल्यास पाण्याची ४० ते ५० टक्के बचत होते.
२. उत्पादनात १५ ते ३० टक्क्याने वाढ होते.
३. विद्राव्य खतांची बचत होते.
४. मजूर लागत नाहीत.
५. तणांची वाढ कमी होते.
हरितगृहातील फुल व फळ पिकांसाठी ठिबक सिंचनाचा वापर केल्यास पाण्याची बचत होऊन उत्पादन चांगले येते.