ऊसाच्या पाचटापासून सेंद्रिय खत तयार करण्याचे तंत्रज्ञान
ऊस शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ऊसाच्या पाचटाचा योग्य प्रकारे पुनर्वापर करणे हा महत्त्वाचा विषय आहे. ऊस काढल्यानंतर मोठ्या प्रमाणावर शेतात पाचट शिल्लक राहते, जे अनेक शेतकरी जाळून टाकतात. मात्र, पाचट जाळल्याने जमिनीतील जिवाणू नष्ट होतात, अन्नद्रव्ये वाया जातात आणि पर्यावरणालाही हानी होते. या समस्येवर उपाय म्हणून विद्यापीठाने एक तंत्र विकसित केले आहे, ज्याद्वारे ऊसाच्या पाचटापासून सेंद्रिय खत तयार करता येते.
पाचट जाळण्याचे दुष्परिणाम:
जमिनीतील जिवाणू नष्ट होतात.
अन्नद्रव्यांचा नाश होतो.
जमिनीच्या तापमानात वाढ होते, त्यामुळे नवीन फुटव्यावर विपरीत परिणाम होतो.
हवेतील कार्बनडायऑक्साइडचे प्रमाण वाढते, ज्यामुळे प्रदूषण होते.
सेंद्रिय खत तयार करण्याची पद्धत:
पाचटाचे योग्य नियोजन करा-
-ऊस तोडल्यानंतर शेतात उरलेले पाचट खोडव्यातील सऱ्यांमध्ये समप्रमाणात पसरावे.
-एकरी 50 किलो युरिया आणि 50 किलो सुपर फॉस्फेट समप्रमाणात टाकावे.
-10 टन उसाची मळी टाकल्याने सेंद्रिय पदार्थ आणि आर्द्रता वाढते.
-4 किलो पाचट कुजविणारे जिवाणू मिश्रणावर पसरावे.
-खोडव्याच्या बगला फोडून पाचटावर माती पसरावी.
-उघडे पाचट असल्यास, पाणी देताना ते दाबून टाकावे.
-ऊस पिकाला नेहमीच्या पद्धतीने पाणी आणि खते द्यावीत.
-3-4 महिन्यांत संपूर्ण पाचट कुजून उत्तम प्रतीचे सेंद्रिय खत तयार होते.
सेंद्रिय खत वापरण्याचे फायदे:
-जमिनीचा पोत सुधारतो आणि सुपीकता वाढते.
-उत्पादनवाढीस मदत होते.
-जैविक खतामुळे जमिनीतील सूक्ष्मजीव सजीव राहतात.
-रासायनिक खतांवरचा अवलंब कमी होतो, त्यामुळे उत्पादन खर्च कमी होतो.
-पर्यावरणपूरक आणि प्रदूषणमुक्त शेतीस मदत मिळते.
ऊसाच्या पाचटाचा योग्य पुनर्वापर करून शेतकरी दर्जेदार सेंद्रिय खत तयार करू शकतात. यामुळे उत्पादनवाढ, जमिनीचे आरोग्य सुधारते आणि पर्यावरणपूरक शेतीला चालना मिळते. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी हे तंत्र अवलंबवून जमिनीच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.