शेवंती फुलपिकाची लागवड व उत्पादन माहिती
फुलांमध्ये गुलाब फुलानंतर शेवंती फुलाचा क्रमांक लागतो. शेवंतीला फुलांची राणी म्हणून संबोधले जाते. शेवंतीचे मुळस्थान चीन असून त्याचा जगभर प्रसार जपानमधून झाला. भारतामध्ये कर्नाटक , महाराष्ट्र , उत्तरप्रदेश , आंध्रप्रदेश , तामिळनाडू येथे शेवंती फुलाची लागवड केली जाते. मोठ्या शहरात या फुलाची मोठ्या संख्येने मागणी असते. शेवंती पुलाखाली महाराष्ट्रात अंदाजे ४०० ते ५०० हेक्टर क्षेत्र आहे. दसरा , दिवाळी , लग्न समारंभात शेवंती फुलाचा आवर्जून वापर केला जातो. हॉटेल्स , घरी सजावटीसाठी या फुलांचा वापर केला जातो. त्यामुळे शेवंती फुलाची मागणी वाढत चालली आहे.
जमीन व हवामान –
१. शेवंती पिकासाठी मध्यम ते हलकी जमीन उत्तम ठरते.
२. पावसाळ्यात जास्त काळ पाणी टिकून रहिल्यास हे पीक खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे उत्तम निचरा करणारी जमीन निवडावी.
३. शेवंती पिकासाठी भारी जमीन निवडू नये.
४. शेवंती पिकास फुले येण्यासाठी कमी कालावधी , कमी तापमान लागते.
५. सुरवातीच्या काळात सूर्यप्रकाश आवश्यक असतो.
६. शेवंती पिकाची वाढ होतांना २० ते ३० अंश से. आवश्यक आहे.
७. शेवंती फुले येण्याच्या कालावधीत १० ते १६ अंश. से तापमानाची आवशकता असते.
८. हलका व मध्यम पाऊस शेवंती पिकास मानवतो.
९. जोरदार पाऊस पडल्यास शेवंती पिकाचे नुकसान होते.
१०. दीर्घकाळ पाऊस पडल्यास शेवंती पिकास रोगाचा प्रादुर्भाव होतो.
लागवड –
१. पाण्याच्या उपलब्धतेनुसार शेवंती लागवड लवकर , उशिरा करता येते.
२. लागवडीची वेळ व फुले येण्याचा काळ लक्षात घेऊन या पिकाची लागवड करावी.
३. महाराष्ट्रात पाण्याची उपलब्धता असेल तर एप्रिल – मे महिन्यात शेवंती पिकाची लागवड करता येते.
४. पाण्याची उपलब्धता नसेल तर जून – जुलै महिन्यात या पिकाची लागवड करता येते.
जाती –
१. शेवंती पिकाच्या अंदाजे १५ ते २० हजार जाती आहेत. त्यांपैकी ५०० जाती भारतात आढळत.
२. महाराष्ट्रात राजा , रेवडी , शरदमाला , बग्गी , सोनाली तारा आदी जाती आढळतात.
पाणी व्यवस्थापन –
१. उन्हाळ्यात लागवड करत असाल तर पिकास पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी.
२. पाऊस सुरु होई पर्यंत ५ ते ७ दिवसांच्या अंतराने पाणी देत राहावे.
३. फुले येण्याच्या काळात पिकांवर पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी.
४. हिवाळ्यात १० ते १५ दिवसांनी आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.
५. पाणी जास्त काळ टिकून राहिल्यास पिकास रोग होण्याची शक्यता असते. त्यामुळे पाण्याचा निचरा होईल याची व्यवस्था करावी.
आंतरमशागत –
१. पीक तणमुक्त राहील याची काळजी घ्यावी.
२. वेळोवेळी निंदणी करावी जेणेकरून जमीन भुसभुशीत राहून पिकांची चांगली वाढ होईल.
३. लागवडीनंतर चौथ्या आठवड्यानंतर शेंड्या खुडण्याचे काम करावे. शेंड्या खुडल्याने अधिक फूटवे फुटून उत्पादनात वाढ होते.
काढणी –
१. शेवंतीचे फुल पूर्ण उमलल्या नंतर त्याची काढणी करावी.
२. सूर्यदयापूर्वी या फुलांची काढणी करावी. फुले उशिरा काढल्यास त्यांचा रंग फिका पडून वजन कमी भरते.
३. जातीनुसार लागवडीनंतर ३ ते ५ महिन्यांनी काढणी करावी.
उत्पादन –
१. हेक्टरी ७ ते १३ टनांपर्यंत सुट्या फुलांचे उत्पादन मिळते.
२. फुलांची पॅकिंग बांबूच्या टोपल्यात किंवा पोत्यात करावी.
३. लांबच्या बाजारपेठेसाठी बांबूच्या टोपलीचा तर जवळच्या बाजापेठेसाठी पोत्याचा वापर करावा.
शेवंती फुलाची वाढती मागणी पाहता याचे उत्पादन घेणे फायद्याचे ठरते.