पिकपाणी

ऊस लागवडीपुर्वी कोणती काळजी घ्यावी? वाणांची माहिती !

Shares

हंगामी ऊसाचा कालावधी हा १२ ते १३ महिन्यांचा असून याची लागवड १ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या दरम्यान केली जाते. तर सुरु ऊस लागवडी पूर्वी कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत ते आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.

-लागवड करण्यापूर्वी मातीची तपासणी करून तिच्या पोषणमूल्यांचा अहवाल मिळवा. या अहवालाच्या आधारे खतांचे नियोजन करा. ऊसाच्या मुळांचा विस्तार साधारणतः १ ते १.५ मीटर खोल जातो, त्यामुळे खोल नांगरणी करणे खूप महत्त्वाचे आहे.


-जमिनीला सेंद्रिय खतांनी समृद्ध करणे आवश्यक आहे. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ०.५ ते ०.६ टक्क्यांपेक्षा अधिक असावे. यासाठी, सुरू उसाला हेक्टरी १० टन कुजलेले शेणखत किंवा ५ टन गांडूळ खत मिसळून द्यावे. तसेच ताग किंवा पैंचा जमिनीत गाडून जमिनीची गुणवत्ता वाढवावी.

-भारी जमिनीत १.५ ते २ फूट खोलीवरील कठीण थर फोडण्यासाठी ५ फूट अंतरावर मोल नांगराने नांगरणी करावी. यामुळे पाण्याचा निचरा सुधारतो व मुळे खोलवर जातात, ज्यामुळे ऊस पडण्याची शक्यता कमी होते.

-ठिबक सिंचन, आंतरपिके व आंतरमशागत यांचा वापर करून सेंद्रिय कर्बाचे प्रमाण टिकवून ठेवावे.

-मातीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असेल तर
-फेरस सल्फेट: हेक्टरी २५ किलो
-झिंक सल्फेट: हेक्टरी २० किलो
-मैंगनीज सल्फेट: हेक्टरी १० किलो

-बोरॅक्स: हेक्टरी ५ किलो

हे सर्व चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये मिसळून द्यावे.

-हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी जैविक उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. यासाठी मेटारायझीयम अनिसोप्ली किंवा बिव्हेरिया बेंसियाना ही जैविक बुरशीनाशके

हेक्टरी २०-२५ किलो, १२५ किलो शेणखतात मिसळून सऱ्यांमध्ये द्यावीत.

ही सर्व प्रक्रिया योग्य पद्धतीने केल्यास ऊस लागवडीतील उत्पादन वाढीस चालना मिळते व जमिनीचा पोत सुधारतो.

 

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव यांनी १ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या उसाच्या सुरु हंगामात लागवडीसाठी कोणत्या वाणांची शिफारस केली आहे ते आपण जाणून घेऊयात.

१. को- ८६०३२ (निरा)
१३ ते १४ महिन्यांचा कालावधी लागतो
सरासरी उत्पादन हे १८० टन प्रति हेक्टर आहे.
वैशिष्ट्ये- मध्यम उशिरा येणारे वाण व साखरेचा उतारा जास्त आहे. गुळाच्या प्रत सोबतच खोडवा चांगला आहे.

२. कोएम-०२६५(फुले -२६५)
१२ ते १३ महिन्यांचा कालावधी
सरासरी उत्पादन १६० टन प्रति हेक्टर आहे
वैशिष्ट्ये- लाल कूज व मर रोगास प्रतिकारक्षम आहे. तिन्ही हंगामात लागवडीसाठी उपयुक्त असून साखरेचा उतारा देखील जास्त आहे.

३. को-९२००५
१२ ते १३ महिन्यांचा कालावधी लागतो
सरासरी उत्पादन १३४ टन प्रति हेक्टर आहे
वैशिष्ट्ये- गूळ व साखर उतारा जास्त आहे. गुळासाठी तर हि उत्कृष्ट जात मानली जाते

४. एमएस- १०००१
१० ते १२ महिन्यांचा कालावधी लागतो
सरासरी उत्पादन १५० टन प्रति हेक्टर आहे.
वैशिष्ट्ये- क्षारयुक्त व चोपण जमिनीसाठी उत्तम व चाबूक कानी, मर, लालकूज,या रोगांसाठी प्रतिकारक्षम आहे.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *