प्रमुख मसाला पीक लवंग लागवड
मसाल्यांमध्ये अतिशय महत्वाचे आणि किमती पीक म्हणजे लवंग. भारतामध्ये तामिळनाडू , केरळ , कर्नाटक राज्यात लवंग पीक प्रामुख्याने घेतले जाते. पदार्थांना चव येण्यासाठी लवंगचा उपयोग केला जातो. त्याच बरोबर औषधे , सुवासिक अत्तरे , टूथपेस्ट यांमध्ये मोठ्या प्रमाणात लवंगचा वापर केला जातो. अनेक प्रकारच्या औद्योगिक उत्पादनात लवंग चा वापर केला जातो. आपण मसाल्यात झाडावरची कळी वापरतो. वाढलेल्या कळ्या उन्हात चांगल्या सुकल्या की लवंग तयार होते. लवंगची मागणी भारतातच न्हवे तर परदेशात सुद्धा आहे. तर जाणून घेऊयात लवंग लागवडीची माहिती.
जमीन व हवामान –
१. लवंग हे पीक सर्व प्रकारच्या जमिनीत घेता येते.
२. उत्तम निचऱ्याची आणि सेंद्रिय पदार्थांचे प्रमाणात अधिक असलेली जमीन लवंग पिकासाठी सर्वोत्तम ठरते.
३. लवंग हे उष्ण कटिबंधातील झाड आहे लवंग पिकास उष्ण व दमट हवामान मानवते.
४. जास्त तापमान असेल तर खोड व पाने करपण्याची शक्यता असते त्याचा विपरीत परिणाम झाडाच्या वाढीवर होतो.
५. लवंग पिकास सावलीची आवश्यकता असते.
६. जर प्रत्येक महिन्यात पाऊस पडत असेल आणि तापमान सौम्य असेल तर लवंगचे उत्पादन उत्तम येते.
पूर्वमशागत –
१. नारळ किंवा सुपारीच्या बागेत लवंग पिकाची लागवड करत असाल तर ४ नारळ किंवा सुपारी रोपानंतर लवंगेचे रोप लावावेत.
२. उन्हाळ्यात ४५ सेंटिमीटर खोल खड्डे खोदावेत. खड्यातून काढलेल्या मातीत २ ते ३ टोपले शेणखत मिसळून खड्डा भरावा.
३. समुद्रकिनाऱ्यावरील रेताड जमिनीत खड्डे भरतांना अर्धी तांबडी माती किंवा गाळाची माती भरावी.
लागवड –
१. कोणत्याही हंगामात लवंगाची लागवड करता येते.
२. जोरदार पाऊस संपल्यानंतर लागवड करणे फायद्याचे ठरते.
३. लागवड करण्यासाठी २ वर्षाचे रोप वापरावेत.
४. खड्यात रोप लावल्यानंतर सभोलतालची माती दाबून घ्यावी.
आंतरमशागत –
१. पहिल्या वर्षी रोपांसाठी सावलीची व्यवस्था करणे गरजचे आहे.
२. लवंग रोपास पाणी देतांना जमीन ओलसर राहील परंतु दलदल होणार नाही याची दक्षता घ्यावी.
३. दलदल झाल्यास मररोग होण्याची शक्यता असते त्यामुळे एकाचवेळी पाणी न देता थोडे थोडें पाणी अनेक वेळा द्यावे.
४. जमिनीत पाणी टिकून राहून जमीन ओलसर राहावी या साठी रोपाभोवती पालापाचोळ्याचे आच्छादन करावेत.
काढणी –
१. दोन वर्षाच्या रोपांची लागवड केल्यास साधारपणे ३ ते ४ वर्षात लवंग पिकास फुले येण्यास सुरु होतात.
२. लवंग पिकास दोन हंगामात फुले येतात. फेब्रुवारी – मार्च महिन्यात प्रमुख उत्पादन तर सप्टेंबर – ऑक्टोबर महिन्यात अल्प उत्पादन मिळते.
३. कळीचा अंकुर दिसायला लागला की ५ ते ६ महिन्यात कळी काढण्यास तयार होते.
४. गुच्छातील सर्व कळ्या एकदाच न काढता फिकट नारंगी रंगाच्या कळ्या प्रथम काढ्याव्यात.
५. चार ते पाच दिवसात कळ्या वाळतात.
उत्पादन –
१५ ते २० वर्षाच्या झाडापासून साधारणपणे २ ते ३ किलो वाळलेल्या लवंग चे उत्पादन मिळते.
लवंग हे मसाल्या पिकातील प्रमुख पीक आहे.या पिकाचा वापर भारतात मोठ्या संख्येने होतो. त्यामुळे या पिकाची लागवड करणे फायद्याचे ठरते.