सुर्यफूल लागवड
महाराष्ट्रात तेलबियामध्ये भुईमुगाच्या पाठोपाठ सूर्यफूल या पिकाचे जवळजवळ ७०% क्षेत्र महाराष्ट्र राज्यात आहे.जगात सोयाबीन खालोखाल सूर्यफूल हे एक महत्वाचे खाद्यतेल आहे.
जमिन आणि हवामान –
१. सूर्यफूल हे पीक वर्षभर घेता येणारे पीक आहे. वर्षभरातील हवामान मानवून घेणारे पीक म्हणून सर्व हंगामात घेता येते.
२. सूर्यफुल लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी.
३. आम्लयुक्त आणि पाणथळ जमिनीत हे पीक चांगले येत नाही.
४. पिकाची फुलोरा अवस्था आणि दाने भरण्याची अवस्था सततच्या पावसात जास्त प्रमाणात सापडणार नाही याचे नियोजन करावे. कारण या दोन्हीही गोष्टी उत्पादनावर परिणाम करणाऱ्या आहेत.
पूर्वमशागत –
१. जमीनीची खोल नांगरट करुन त्यानंतर कुळवाच्या उभ्या आडव्या दोन ते तीन पाळ्या द्याव्यात.
२. शेवटच्या कुळवाच्या पाळीपूर्वी हेक्टरी २० ते २५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत घालावे.
३. पिकाच्या वाढीसाठी चांगली भुसभुशीत जमीन तयार करावी लागेल.नांगरणी, वखरणी, फळी फिरवून ढेकळे फोडावीत.
बियाणे –
१. सुर्यफुलाच्या पेरणीसाठी सुधारित वाणाचे ८-१० किलो बियाणे आणि संकरित वाणाचे ५ ते ६ किलो बियाणे प्रति हेक्टरी वापरावे.
२. बियांच्या लवकर उगवणीसाठी पेरणीपूर्वी बियाणे १२-१४ तास पाण्यात भिजवून सावलीत वाळवावे.
३. बियाण्यास २-३ ग्रॅम थायरम किंवा कॅप्टन या बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी.
४. सूर्यफुलाची पेरणी जमिनीच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या अंतरावर पेरणीयंत्राच्या सहाय्याने करावी.
५. टोकण पद्धतीने सुध्दा सूर्यफूल पेरता येते व बियाण्याची बचत होते.
६. सूर्यफूल ५ सें.मी. पेक्षा जास्त खोल पडणार नाही याची काळजी घ्यावी.
खत व्यवस्थापन –
१. सूर्यफुलाचे पीक हे रासायनिक खतांना चांगला प्रतिसाद देत असल्याने संतुलित खत व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.
२. सूर्यफुलास नत्र, स्फुरद, पालाश या मुख्य अन्नद्रव्यांबरोबरच सल्फर या अन्नद्रव्यांची गरज आहे.
३. कोरडवाहू विकास प्रति हेक्टरी २.५ टन शेणखत तसेच ५० किलो नत्र, २५ किलो स्फरद आणि २५ किलो पालाश पेरणीच्या वेळेस दोन चाड्याच्या पाभरीने पेरून द्यावे.
४. बागायती पिकास प्रति हेक्टरी ६० किलो नत्र + ३० किलो स्फूरद + ३० किलो पालाश द्यावे.
५. यापैकी ३० किलो नत्र व संपूर्ण स्फुरद आणि पालाश पेरणीच्या वेळी द्यावे व उरलेल्या ३० किलो नत्राची मात्रा पेरणीनंतर एक महिन्याच्या आत द्यावी.
६. गंधकाची कमतरता असलेल्या जमिनीसाठी प्रति हेक्टरी २० किलो गंधक पेरणीच्या वेळी गांडूळ खतातून द्यावे.
पाणी व्यवस्थापन –
१. सुर्यफूलाच्या पिकास संवेदनक्षम अवस्थेत पाणी देणे अत्यंत गरजेचे आहे.
२. सूर्यफूल हे पाण्यासाठी अति संवेदनशील असे पीक आहे.
३. सूर्यफुलाच्या एकूण पाणी वापराचा विचार केल्यास २० टक्के पाणी वाढीसाठी ५५ टक्के पाणी फुलोरा अवस्थेत तर उरलेले २५ टक्के पाणी दाणे भरण्यासाठी उपयोगात आणले जाते. म्हणून सूर्यफुलात पुढील अवस्था फारच संवेदनशील आहेत.
४. फुलकळी अवस्था ते दाणे भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास दाणे पोकळ राहतात व उत्पादनात घट येते.
काढणी आणि उत्पादन –
१. सुर्यफूलाची पाने, देठ व फूलाची मागील बाजू पिवळी झाल्यानंतर पिकाची कापणी करावी.
२. कणसे चांगली वाळवून नंतर मळणी करावी.
३. कोरडवाहू पिकापासून प्रति हेक्टरी ८ ते १० क्विंटल, संकरित वाणापासून १२ ते १५ क्विंटल आणि बागायती/संकरित वाणापासून प्रति हेक्टरी १५ ते २० क्विंटल उत्पादन मिळते.