या घरगुती उपायांनी जनावरांचे आजार बरे करा
माणसांप्रमाणेच जनावरांना सुद्धा रोग आणि आजार होत असतात. त्यात जनावरांमध्ये सर्वात जास्त दिसणारा विकार म्हणजे त्वचा विकार. त्वचा विकाराचे मुख्य कारण म्हणजे शेतकऱ्यांचे जनावरांकडे होणारे दुर्लक्ष आणि विकाराचे अयोग्य निदान. शेतकऱ्यांना असे काही विकार किंवा त्यांचे लक्षणे दिसून आल्यावर शेतकऱ्यांनी लगेचच पशुवैद्यकांना दाखवून उपचार करवून घ्यावेत.
जनावरांमध्ये आढळणाऱ्या लक्षणांमध्ये, त्वचेवर एखादा चट्टा किंवा पुरळ येते, त्या भागाला खाज सुटते, मग गोठ्यातील भिंतीला किंवा खांबाला जनावरे अंग घासतात यामुळे जनावरांची त्वचा लाल होते. ही त्वचा विकाराची सुरवातीची लक्षणे असतात . यावर योग्यवेळी उपचार केला नाही तर, जिवाणूंचा संसर्ग होऊन या आजाराची तीव्रता वाढते आणि तो विकार अजून पसरतो. त्वचा विकारांवर उपचार करण्यापूर्वी त्याचे योग्य निदान होणे आवश्यक आहे. परोपजीवी जंतूंमुळे होणाऱ्या त्वचाविकाराची अजून बरीच कारणे आहेत.
चला तर पाहुयात.. जनावरांना होणाऱ्या त्वचा विकारावर उपयुक्त असणाऱ्या काही औषधी वनस्पती :-
कडूलिंब :
अनेक आजारांवर लिंबोळी आणि कडूलिंबाची पाने औषधी स्वरुपात वापरली जातात. कडूलिंबाचे तेल हे त्वचा विकारांवर अत्यंत गुणकारी आहे. कडूलिंबांमध्ये जीवाणू, परोपजीवी जंतू आणि बुरशी विरोधी गुणधर्म असल्यामुळे जवळपास सर्व प्रकारच्या त्वचा विकारांमध्ये कडूलिंबाचा चांगला उपयोग होतो. कडूलिंबामुळे बाह्य परोपजीवी जसे की उवा, गोचिड कमी होण्यासाठी मदत होते. त्यामुळे त्वचा विकाराचा प्रादुर्भावसुद्धा कमी होतो. कडूलिंबाचे तेल जनावरांच्या त्वचा विकारांवर बाहेरून लावावे.
करंज :
करंज किंवा करंजी या नावाने ओळखली जाणारी वनस्पती खूप गुणकारी आहे. करंजीच्या तेलातसुद्धा परोपजीवी जंतुविरोधी आणि बुरशीविरोधी गुणधर्म आहेत.करंजी तेलाचा वापर बाह्योपचाराकरिता करावा.
अर्जुन :
अर्जुन वृक्ष मोठा असतो. याची सालं त्वचा विकार आणि रक्तस्रावावर खूप गुणकारी ठरतात. याच्या सालीचा वापर सुद्धा जनावरांच्या बाह्योपचाराकरिता करावा.
हळद :
सर्वांच्या घरी सहज उपलब्ध होणाऱ्या हळदीमध्ये जिवाणूविरोधी गुणधर्म असतात, तसेच हळद सूजविरोधी आणि दाहनाशक म्हणूनही अत्यंत उपयुक्त आहे. हळकुंडाची पावडर, कडूलिंब, करंज तेलात मिसळून त्वचा विकारांवर लावावी.
कन्हेर :
कन्हेर ही वनस्पती फुलांसाठी प्रसिद्ध आहे. या वनस्पतीची पाने आणि मूळ ओले असताना ठेचून त्याचा लेप त्वचा विकारांवर द्यावा. या उपचारामुळे बाह्योपरोपजीवींचे नियंत्रण होण्यास मदत होते.
तुळस :
सर्वांच्या दारासमोर असणारी तुळशीची पाने, मंजुळा किंवा तुळशीचे तेल यात जीवाणू आणि बुरशी विरोधी गुणधर्म असतात. कन्हेरप्रमाणेच पाने आणि मंजुळा ठेचून त्याचा लेप त्वचा विकारांवर लावावा किंवा थेट तुळशीच्या तेलाचा वापर करावा.
जनावरांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरणाऱ्या वनस्पतींचा एकत्रित वापर कसा करावा ?
विशिष्ट औषधी गुणधर्माच्या वनस्पती एकत्र करून आपण त्याचा वापर जनावरांच्या त्वचाविकारासाठी उपचार म्हणून करू शकतो. यासाठी…
कडुलिंब तेल – 20 मि.लि.
करंज तेल – 20 मि.लि.
अर्जुन – 4 ग्रॅम
हळद – 5 ग्रॅम
कन्हेर – 3 ग्रॅम
तुळस तेल – 10 मि.लि.
हे सर्व घटक एकत्र करून, दररोज 2 ते 3 वेळा जनावरांच्या त्वचाविकारांवर लावावे. यामुळे त्वचा विकार कमी होण्यास मदत होते आणि जनावरांना होणारा त्रास व जळजळ कमी करण्यासाठी हे मिश्रण उपयुक्त ठरते. यामुळे प्राथमिक स्वरूपात हा सोपा उपाय आपल्या जनावरांना त्रासापासून सुटका देऊ शकतो.
ब्युरो रिपोर्ट – किसनराज डेस्क