आधुनिक गुऱ्हाळाचा वापर करून तयार करा सेंद्रिय गूळ
महाराष्ट्रामध्ये कित्येक ठिकाणी गूळनिर्मिती केली जाते. बऱ्याच ठिकाणी आधुनिक पद्धतीचे गुऱ्हाळ उभारले जाऊ लागले आहे. गूळ उत्पादक असणाऱ्या कोल्हापूर जिल्हात एक कणेरी मठ आहे ज्या मठाचे स्वतःचे ‘कृषी विज्ञान केंद्र’ आहे. कृषी विज्ञान केंद्राने ग्राहकांची मागणी पाहून स्वतः गुळनिर्मिती केंद्र उभारले आहे. या गूळनिर्मितीसाठी त्यांनी ३५ लाख रुपये खर्च करून आधुनिक पद्धतीचे गुऱ्हाळ उभारले आहे. पारंपरिक गुऱ्हाळासाठी कमीत कमी १ एकर जमीन लागते आणि १५ ते २० मजूर लागतात. पण आधुनिक गुऱ्हाळ उभारण्यासाठी या मठाने वेगवेगळ्या यंत्राचे नियोजन करून फक्त ४ ते ५ गुंठ्यात उभारले आहे, आणि विशेष म्हणजे मनुष्यबळात बचत होऊन फक्त सहा मजुरांमध्ये काम भागते.
गूळ प्रक्रिया
पारंपरिक गुऱ्हाळ पद्धतीमध्ये चिपाड वाळवण्यासाठी बराच वेळ लागायचा, पण या आधुनिक गुऱ्हाळामध्ये चिपाड वाळवण्यासाठी ४० फूट लांबीचा लोखंडी टायर बसवण्यात आला आहे. हा लोखंडी टायर चुलवणातील उष्णता खेचून घेतो आणि कमीत कमी २० ते ३० मिनिटांमध्ये चिपाड वळविले जाते. क्रशर ते ड्रायरच्या मध्ये सेटअप बसवला गेला आहे. जेव्हा घाण्यात चिपाड टाकले जाते, तेंव्हा त्याचा रस आणि चिपाड वेगळे होते आणि जो तयार झालेला रस आहे तो मोटरच्या साहाय्याने पहिल्या कढई मध्ये टाकला जातो तर चिपाड सुद्धा ड्रायर कडे नेले जाते.
आधुनिक गुऱ्हाळाचे फायदे –
आधुनिक गुऱ्हाळामुळे फक्त मनुष्यबळातच बचत नाही झाली, तर यामध्ये सर्व प्रक्रिया करण्यासाठी वेळ सुद्धा कमी लागतो. जुन्या गुऱ्हाळमध्ये ऊस गाळला की पडलेले चिपाड गोळा करणे ते चिपाड लांब नेहून वाळवणे. वाळलेले चिपाड परत गोळा करून आणणे आणि चुलीमध्ये टाकणे. एवढी दीर्घ प्रक्रिया होती, पण आधुनिक पद्धतीच्या गुऱ्हाळामध्ये कमी वेळेत सर्व प्रक्रिया पूर्ण होत आहे. वेळेच्या बचतीसोबतच १२५ ते १५० किलो गूळ तयार होतो.
जुन्या पद्धतीमध्ये गुऱ्हाळाच्या चिमनीमधून आगीच्या ज्वाला वाया जायच्या पण आधुनिक पद्धतीमध्ये ज्वाला या ड्रायर साठी वापरतात. याच ड्रायरमध्ये चिपाड वाळवून वापरता येते. जुन्या पद्धतीसारखे चिपाड वेळेपर्यंत थांबावे लागत नाही.
आधुनिक गुऱ्हाळासाठी किती आहे गुंतवणूक :-
आधुनिक पद्धतीचे गुऱ्हाळ उभारायचे असल्यास साधारणपणे ३५ लाख रुपये खर्च येतो. यापैकी सुमारे १८ लाख रुपये यंत्रसामग्रीसाठी लागतात तर बाकी इतर खर्च येतो.
अशाप्रकारे आधुनिक पद्धतीने, सोप्या आणि सुटसुटीत नियोजनाने आपण गूळ उद्योगाला गती देऊ शकतो. ज्यातील मनुष्यबळाचा कमी वापर आणि वेळेची बचत ह्या गोष्टींचा विशेष असा फायदा आधुनिक गुऱ्हाळांना होतोय.
ब्युरो रिपोर्ट – किसानराज डेस्क