सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी ऊस पाचट कुजवणे अत्यंत आवश्यक – डॉ. देवसरकर

Shares

महाराष्ट्रात ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. परंतु इतर राज्याच्या तुलनेने ऊस उत्पादकता कमी आहे. यासाठी ऊस (Sugar Cane) पिकाचे एकात्मिक व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे. याचबरोबर ऊसाची पाचट जाळता ती शेतातच कुजवणे गरजेचे आहे. ज्यामुळे आपल्या जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे (Organic Curb ) प्रमाण वाढण्यास खूप मोठ्या प्रमाणात मदत होते, असे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे संचालक (विस्तार शिक्षण) डॉ.देवराव देवसरकर यांनी व्यक्त केले. वनामकृवि, परभणी अंतर्गत असणाऱ्या कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड औरंगाबाद यांच्याद्वारे दि.०१ जानेवारी, २०२१२ रोजी ७० वा शेतकरी शास्त्रज्ञ मंच कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक म्हणू डॉ.देवसरकर बोलत होते.

हे ही वाचा (Read This Also ) पेस्टीसाईडचा सुरक्षित वापर करणे आहे अत्यंत गरजेचे.

 यावेळी डॉ.देवसरकर यांनी सांगितले कि, शेतकऱ्यांनी ऊस पिकामध्ये लागवड अंतर देखील वाढवणे गरजेचे आहे. तसेच सूक्ष्म अन्नद्रव्य ऊस पिकाला देणे अत्यंत आवश्यक आहे. यावेळी त्यांनी सांगिलते कि, या वर्षी परभणी कृषि विद्यापीठामार्फत सोयाबीन चा एमएयुएस -७२५, करडईचा पीबीएनएस-१५४ तसेच हुरड्याचा परभणी वसंत तसेच राहुरी कृषि विद्यापीठामार्फत ज्वारीचा फुले यशोमती, उडिदाचा फुले वासू, तिळाचा फुले पूर्णा,  ऊसाचा फुले ११०८२, पेरूचा फुले अमृत, द्राक्षाचा मांजरी किसमिस तर अकोला कृषि विद्यापीठ द्वारे धान चा पीडीकेव्ही साधना आणि हुरड्याचा ट्रोम्बे अकोला हे वाण विकसित करण्यात आलेले आहेत.

या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राचे ऊस बेणे विक्री अधिकारी डॉ.डी.एस.थोरवे, औरंगाबादचे ( Aurangabad )जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री.तुकाराम मोटे, जि.प.औरंगाबादचे कृषि विकास अधिकारी श्री.पी.आर.देशमुख तसेच औरंगाबाद केव्हीकेचे कार्यक्रम समन्वयक डॉ.किशोर झाडे, विषय विशेषज्ञ डॉ.बस्वराज पिसुरे, डॉ.अनिता जिंतुरकर, डॉ.संजूला भावर, प्रा.अशोक निर्वळ, प्रा.गीता यादव आदी व शेतकरी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. यावेळी ऊस पाचट व्यवस्थापन व ऊस खोडवा व्यवस्थापन या विषयी मार्गदर्शन करताना डॉ.थोरवे म्हणाले कि, ऊस पिकामध्ये मोफत मिळणारा पाचट हा अत्यंत महत्वाचा सेंद्रिय पदार्थ आहे. कारण ऊसाच्या पाचटात ०.५ टक्के नत्र, ०.२ टक्के स्फुरद आणि ०.७ ते १ टक्के पालाश आणि ३२ ते ४० टक्के सेंद्रिय कर्ब असते. आपण पाचट शेतातच कुजवणे गरजेचे आहे कारण एक हेक्टर क्षेत्रातून ८ ते १० टन पाचट मिळते आणि त्यापासून ४० ते ५० किलो नत्र, २५ ते ३०  किलो स्फुरद, ७५ ते १०० किलो पालाश आणि ३ ते ४ हजार किलो सेंद्रिय कर्ब जमिनीत घातले जाते. तसेच खोडवा पीक घेताना १५ फेब्रुवारी पर्यंत तुटलेल्या ऊसाचाच खोडवा घ्यावा. सर्व साधारणपणे को-८६०३२, को-२६५, को-८००५ याच वाणांचा खोडवा घ्यावा. तसेच खोडवा मध्ये मर व गवताळ रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी चांगल्या प्रतीचे बेणे निवडून बाविस्टीनची बेणे प्रक्रिया करूनच लावावे तसेच दर ३-४ वर्षांनी बेणे बदल करावा. ऊस तुटून गेल्यानंतर बुड्क्यांची छाटणी करून लगेचच ०.१ टक्के बाविस्टीन (०१ ग्रॅम ०१ लिटर पाणी) या बुरशीनाशकाची फवारणी करावी. तसेच सरीत ठेवलेल्या पाचटावर प्रति हेक्टर ८० किलो युरिया व १०० किलो सिंगल सुपर फोस्फेट टाकावे. त्यानंतर १० किलो पाचट कुजवणारे संवर्धन सेंद्रिय खतात मिसळून पाचटावर पसरून टाकावे. खोडवा ऊसामध्ये देण्यात येणाऱ्या खतांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी पहारीच्या सहाय्याने खते द्यावीत. यामुळे उत्पादनात १०-१५ टक्यांनी वाढ होते. खोडवा ऊसासाठी १५ दिवसांच्या आत १२५ किलो नत्र, ५८  किलो स्फुरद आणि ५८ किलो पालाश तर १३५ दिवसांनी १२५ किलो नत्र, ५७  किलो स्फुरद, ५७ ते १०० किलो पालाश असे खत व्यवस्थापन करावे. याचबरोबर फेरस सल्फेट १० किलो, झिंक सल्फेट १० किलो, मॅगनीज सल्फेट ०३ किलो, मॅग्नेशियम सल्फेट ०३ किलो, बोरॉन ०२ किलो आणि सिलिकॉन १० किलो हि सूक्ष्म अन्नद्रव्य १०० किलो शेणखतात मिसळवून  देणे अत्यंत गरजेचे आहे. त्याच पद्धतीने जीवाणू संवर्धन व द्रवरूप खताचा शिफारशीत वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. आणि ऊसातील कीड व्यवस्थापनासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करावा. या सर्व बाबींचा अवलंब केल्यास ऊसाच्या उत्पादनात नक्कीच मोठ्या प्रमाणावर वाढ होण्यास मदत होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत डॉ.किशोर झाडे यांनी केले. तसेच डॉ.बस्वराज पिसुरे यांनी केव्हीके औरंगाबादचे विविध कार्य, केव्हीकेद्वारे उपलब्ध सुविधा आणि घेण्यात येणारे विविध कार्यक्रम याबद्दल शेतकऱ्यांना माहिती दिली. तसेच या कार्यक्रमातील मार्गदर्शनाचा व्हिडीओ केव्हीकेच्या युट्युब चॅनेलवर पाहता येतील असेही त्यांनी सांगितले. शेवटी डॉ.संजूला भावर यांनी उद्घाटन सत्रात सर्व मान्यवरांचे तर श्री.अशोक निर्वळ यांनी तांत्रिक सत्रात सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केव्हीकेतील सर्वच कर्मचा-यांनी नियोजन केले. तसेच यावेळी शेतकऱ्यांच्या समस्येचे निराकरण शास्त्राज्ञाद्वारे करण्यात आले.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *