Maharashtra Unlock : नवे नियम जाहीर; रात्री ८ वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्याची परवानगी

Shares

११ जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम! व्यापारी वर्गाला मिळालाय दिलासा;

राज्य सरकारने अनलॉकबाबतची नवी नियमावली आज जाहीर केली आहे. यात व्यापारी वर्गांसाठी दुकांनाच्या वेळा वाढवण्यात आल्या आहेत. या नव्या नियमावलीनुसार सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत आणि शनिवारी दुपारी ३ वाजेपर्यंत दुकाने सुरू राहणार आहेत. या अनलॉकच्या नव्या नियमावलीकडे अवघ्या राज्याचं विशेष करून व्यापाऱ्याचं जास्त लक्ष लागलेलं होतं. यामुळे राज्यभरातील जवळपास २५ जिल्ह्यांना दिलासा मिळणार आहे. ज्या ठिकाणी रूग्ण कमी होताय तिथल्या नागरिकांसाठी हा दिलासा असणार आहे. तर, पुणे, साताऱ्यासह ११ जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम असणार आहेत.

राज्यातील निर्बंध कायम असणाऱ्या ११ जिल्ह्यांमध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, अहमदनगर, बीड, रायगड आणि पालघर यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांत तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू असणार आहेत. या नव्या नियमानुसार जिम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा हे रात्री ८ वाजेपर्यंत सुरू असणार आहे. पण यासाठी ५० टक्के क्षमतेची मर्यादा घालण्यात आली आहे. यासोबतच वातानुकुलित यंत्रणा वापरायला मात्र बंदी असणार आहे. रविवारी मात्र अत्यावश्यक सेवेतली दुकाने वगळता सर्व दुकानं बंद राहतील. तर, धार्मिकस्थळ उघडण्यास अद्याप परवानगी देण्यात आलेली नसून, राज्यभरात धार्मिकस्थळं ही बंदच असणार आहे. सरकारी आणि खासगी कार्यालये पूर्ण क्षमतेनं चालवण्यास परवानगी देण्यात आली आहे. फक्त गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे. याचबरोबर, जी कार्यालयं वर्क फ्रॉम होम बेसिसवर चालत होती किंवा चालू शकतात ती तशीच चालू ठेवण्यास सांगण्यात आलेले आहे.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *