कापुस लागवड तंत्रज्ञान व व्यवस्थापण

Shares

सध्या कोरोना विषाणू कोव्हीड-१९ च्या पार्श्वभूमीवर शेत मशागत तसेच इतर शेती कामांवर परिणाम झाला असून तोंडावर आलेल्या खरीप हंगामाच्या दृष्टीकोनातून शेतीच्या कामाचे नियोजन हे कमप्राप्त आहे. हवामान खात्याच्या पहिल्या अंदाजानुसार यावर्षी चांगला पाऊस अपेक्षित आहे व हि बाब निश्चितच शेतकर्यासाठी समाधानाची आहे.सध्या सर्वत्र शेती मशागतीच्या कामांना वेग आला असून येणाऱ्या खरीप हंगामासाठी बी-बियाणे व खते तसेच इतर निविष्टा खरेदीची लगबग दिसून येत असून कपाशी बियाण्याची उपलब्धता येत्या 1 मे पासून शासन स्तरावर करण्यात येत आहे. यावर्षी सोयाबीन बियाण्याचा तुटवडा पडण्याची शक्यता असून कापूस पिकाखालील क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे..
कापूस पिकासाठी जमीन मशागतीपासून ते काढणीपर्यंतचे महिन्या निहाय लागवड तंत्रा संबधी महत्वाच्या बाबी खाली दिल्या असून शेतकरी बांधवांनी त्याचा अवलंब करावा.

मे

मे महिन्यात जमीन मशागतीवर भर द्यावा.कोरडवाहू पिकाकरीता तीन वर्षातून एकदा खोल नांगरणी करावी आणि बागायती कपाशी लागवडीकरिता अगोदरचे पिक निघाल्यानंतर त्वरित २०-२५ से.मी. खोलवर नांगरणी करावी.

जमिनीच्या नांगरणी नंतर उभी आडवी वखरणी करावी.हि सर्व मशागतीची कामे उताराला आडवी करावी. जमिनीची योग्य मशागत करुन शेवटच्या वखरणीपूर्वी कोरडवाहू पिकासाठी शेतात हेक्टरी १२ ते १५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत तसेच बागायती लागवडीसाठी २०-२५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत /कंपोस्ट खत शेतात सम प्रमाणात पसरून टाकावे. उपलब्ध असल्यास गांडूळखत प्रती हेक्टरी २.५ टन शेणखत/ कंपोस्ट खतासोबत शेतात टाकून वखरवाही करुन जमिनीत एकसारखे मिसळून द्यावे व जांभूळवाहीची वाट पहावी

खरीप पिकांचा नियोजनाचा आराखडा तयार केल्यानंतर कपाशीसाठी आवश्यकतेनुसार लागणारे बीटी तसेच सुधारित व सरळ वाणांचे बियाणे, सेंद्रिय खते,रासायनिक खते, बीजप्रक्रियेसाठी लागणारे थायरम, बाविस्टीन, ट्रायकोडर्मा,जैविक खते,पी.एस.बी., तसेच लागणारी सूक्ष्म अन्नद्रव्ये याची जुळवाजुळव करुन ठेवावी. बागायती कपाशी ठिबक सिंचनावर घ्यावयाची असल्यास ठिबक संचाची मांडणी तसेच फर्टीगेशन यूनिट यांचे योग्य नियोजन करावे.

बॉडअळीचा होणारा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पूर्व हंगामी कपाशीची लागवड टाळावी.

जून

बियाणे खरेदी करतांना पक्क्या बिलासह नामांकित कंपन्यांचे बीटी कापूस बियाणे तसेच विदयापीठ निर्मित सुधारित व सरळ वाण खरेदी करावे.

कोरडवाहू कापसाची पेरणी १५-३० जून किंवा मान्सूनचा ७५ ते १०० मिमी पाऊस (पेरणीयोग्य) झाल्यावर  लवकरात लवकर पेरणी करावी.जांभूळवाही करुनच पेरणी करावी.जांभूळवाही केल्यास तणांच प्रादुर्भाव २० टक्क्यांनी कमी होतो.

विदर्भामध्ये कपाशीचे पिक बहुतांशी मोसमी पावसावर अवलंबून असल्यामुळे या पिकासाठी उत्तम जलधारणा शक्ती असणारी जमीन निवडावी. अति खोल व खोल जमिनीमध्ये (९० से.मी.च्या वर) कपाशीचे सलग पीक घ्यावे. जमिनीच्या मगदुरानुसार कापुस वाणाची वड करावी तसेच पिकाच्या लागवडीतील अंतर ठेवावे.उथळ व हलक्या जमिनीत बीटी कपाशीची लागवड करू नये.

मागील वर्षी ज्या शेतात सोयाबीन,मुग,उडीद,तूर, किंवा ज्वारी यासारखी पीके घेतली त्या शेतात पिक फेरपालट म्हणून कपाशीची लागवड करावी

भारी काळ्या कापसाच्या जमिनीकरिता रस शोषक किडीस सहनशील (लवयुक्त) बीटी हायब्रीड (१८० दिवसापेक्षा कमी कालावधीचे) निवड करावी.

मध्यम ते भारी जमिनीमध्ये अधिक आर्थिक मिळकतीकरिता शिफारशीनुसार प्रभावी आंतरपीक पद्धतीमध्ये कापूस+मुग,(१:१) किंवा कापूस+उडीद किंवा लवकर येणाऱ्या सोयाबीन जाती (१:१) चा अवलं करावा तसेच कपाशी+ज्वारी+तूर+ज्वारी (६:१:२:१ ओळी) या आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा.तसेच कपाशीच्या ८ ते १० ओळीनंतर तूर पिकाचे आंतरपीक घ्यावे.

शेतकऱ्यांनी नॉन बीटी (रेफुजी) कपाशीची लागवड बीटी कपाशी सभोवताली आवर्जून करावी. नॉन बीटी कपाशीची लागवड शेतकरी करीत असल्यास गाउचो या कीटकनाशकाची बीज प्रक्रिया ३ यम प्रती किलो बियाणे या प्रमाणात करावी.

पेरणी करिता दर्जेदार,बीज प्रक्रिया केलेले व शिफारस केलेल्या वाणांचे शक्यतोवर तंतू विरहीत बियाण्याचा वापर करावा.बीज प्रक्रिया केलेली नसल्यास पेरणी पूर्वी बियाण्यास कारोक्झीन (व्हिटाव्हाक्स) १ यम किंवा थायरम ३ यम याप्रमाणे बीज प्रक्रिया करावी.

संकरीत बागायती कपाशी पेरणीकरिता लागवडीची पद्धत, सरी वरंबा,कुशा पद्घत किंवा ठिबक सिंचनाचा अवलंब करावा. भारी जमिनीकरिता लागवडीचे अंतर १२० x ६० किंवा १२०४ ९० सेमी. ठेवावे.बियाण्याचे हेक्टरी प्रमाण २-२.५ किलो घेऊन रासायनिक खते १००:५०:५० नत्र,स्फुरद व पालाश या मात्रेत द्यावे.

कोरडवाहू देशी कपाशी लागवडीकरिता देशी सुधारित जाती एकेए-५, एकेए-७,एकेए-८,एकेए-८४०१ या वाणांची निवड करावी.
पेरणी सरत्याने किंवा टोकून करावी.देशी कपाशीसाठी अंतर ६० x १५ सेमी.किंवा ६० x ३० सेमी. ठेवावे. हेक्टरी बियाण्याचे प्रमाण १२-१५ किलो वापरावे.देशी कपाशी करिता ४०:२०:२० किलो
नत्र, स्फुरद व पालाश प्रती हेक्टरी द्यावा.

कोरडवाहू अमेरिकन सुधारित कापूस लागवडीकरिता एकेएच-०९-५( सुवर्ण शुभा),पिकेव्ही रजत, एकेएच-८८२८, हे वाण ६० x ३० सेमी.अंतरावर पेरावे.
एकेएच-०८१ या वाणाची ६० x १५ सेमी.अंतरावर पेरणी करावी. रासायनिक खताची मात्रा ६०:३०:३० किलो नत्र,स्फुरद व पालाश प्रती हेक्टरी द्यावी.
(६५ किलो युरिया,१८७ किलो सिंगल सुपर फोस्फेट ५० किलो मयुरेट ऑफ पोटाश आणि लागवडीनंतर ३० दिवसांनी ६५ किलो युरिया प्रती हेक्टरी द्यावा).

अति घनता लागवडीकरिता एकेएच -०८१ या वाणाची ६० x १० सेमी. अंतरावर हेक्टरी १५ किलो बियाणे घेऊन लागवड करावी.

देशी संकरीत कापूस लागवडीकरिता पिकेव्ही डीएच-१ व पिकेव्ही सुवर्णा या वाणांची लागवड करावी.योग्य खत व्यवस्थापनाकरिता ६०:३०:३० किलो नत्र,स्फुरद व पालाश प्रती हेक्टरी द्यावे. (६५ किलो युरिया, १८७ किलो सिंगल सुपर फोस्फेट व ५० किलो मयुरेट ऑफ पोटाश).

कोरडवाह बीटी वाण ९० x ४५ सेमी. अंतरावर पेरावे आणि ओलितासाठी हे अंतर १२०x३० सेमी.ठेवावे. कोरडवाहू बीटी कपाशी करिता ६०:३०:३० किलो नत्र,स्फुरद व पालाश प्रती हेक्टरी द्यावे. (६५ किलो युरिया,१०० किलो सिंगल सुपर फोस्फेट ५० किलो मयुरेट ऑफ पोटाश).

माती परीक्षण केले असल्यास त्यानुसारच रासायनिक खतांचे नियोजन करावे.

बागायती बीटी कपाशी साठी १२०६०-६० किलो नत्र, स्फुरद व पालाश प्रती हेक्टरी द्यावे.(८७ किलो युरिया, ३७ किलो सिंगल सुपर फोस्फेट आणि १०० किलो मयुरेट ऑफ पोटाश पेरणी सोबत व पेरणी नंतर ३० दिवसांनी ७ किलो युरिया आणि ६० दिवसांनी ८७ किलो युरिया प्रती हेक्टरी द्यावा)

उगवणपूर्व तण नाशकांचा वापर :सुरवातीच्या काळात शेत तण विरहीत ठेवण्यासाठी व कपाशीच्या चांगल्या उगवणीसाठी उगवणपूर्व तण नाशकांचा वापर करावा यामध्ये तण नियंत्रणासाठी पेंडीमेथालीन ३८.७% या उगवणपूर्व तणनाशकाची १.५-१.७५ किलो/हेक्टरी व्यापारी घटकाची (२०-२५ मिली प्रती १० लिटर पाणी) किंवा डायुरॉन ८० टक्के डब्लु.पी.या तण नाशकाची १,०.२,०० किलो/हेक्टरी व्यापारी घटकाची (२०-३० ग्रम प्रती १० लिटर पाणी) या प्रमाणात पेरणी नंतर जमिनीवर फवारणी करावी.

जुलै

बियाण्याच्या उगवणीनंतर ३-५ दिवसात खाडे नांगे भरावेत.आणि १५-२० दिवसातविरळणी करुन शेतात अपेक्षित झाडांची संख्या राखावी.

आंतरमशागत व तण व्यवस्थापण: कपाशीचे पिक पहिले ९ आठवडे तण विरहीत ठेवणे जास्त आवश्यक आहे,त्याकरिता बियाणे उगवणीनंतर १० ते २० दिवसाच्या अंतराने दोन ते तीन वेळा डवरणी करावी व आवश्यकतेनुसार २-३ वेळा निंदनी करावी. गरज भासल्यास शिफारस केलेल्या उगवण पश्चात तणनाशकांचा योग्य वेळी व योग्य प्रमाणातच वापर करावा.उगवणपश्चात तणनाशकामध्ये उभ्या पिकात पिक ३०-४० दिवसाचे असतांना पायरीथीओबक सोडियम १०% इ.सी.(हिटविड) या तणनाशकाची ०.६२५.०,७५० किलो/हेक्टरी व्यापारी घटकाची (१२.५-१५ मिली प्रती १० लिटर पाणी) किंवा तृणवर्गीय तणांचा जास्त प्रादुर्भाव असल्यास क्विझालोफोप इथाइल ५%इ.सी.(टरगा सुपर) या तण नाशकाची १.० लिटर किलो/हेक्टरी व्यापारी घटकाची (२० मिली प्रती १० लिटर पाणी) या प्रमाणात फवारणी करावी.तण नाशकाची फवारणी करतांना शिफारशीत तण नाशकांचाच वापर करावा व तणनाशक फवारणी साठी शक्यतोवर वेगळा पंप वापरावा.तणनाशकाचा वापर करतांना वापरण्यात येणारे नोझल,हेक्टरी द्रावण, तणनाशकाची मात्रा इ. बाबतीत दक्षता बाळगावी. तसेच तण नियंत्रणाच्या दृष्टीने डवरणी व निंदन तसेच इतर मशागतीचे नियोजन करावे.

आठवड्यातून एकवेळा कपाशीच्या शेतातील १२-१४ झाडांचे निरीक्षण करावे. रस शोषक किडींच्या व्यवस्थापनाकरिता पिवळ्या चिकट सापळ्यांचा वापर करावा,

रस शोषक किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यास असीटामिपीड २० एसपी.१५ यम क्रियाशील घटक प्रती हेक्टर या प्रमाणात एक फवारणी करावी..

बोंड अळ्यांच्या सर्वेक्षणासाठी २ कामगंध सापळे प्रती एकर शेतात उभारावेत. मोठ्या प्रमाणामध्ये नर पतंग जेरबंद करण्यासाठी हेक्टरी २० कामगंध सापळ्यांचा वापर करावा.बोंड अळ्यांच्या प्रकाराप्रमाणे विविध ल्यरचा वापर करावा व प्रत्येक महिन्यात या सापळ्या मधील ल्युर बदलावेत.

दर आठवड्याला शेतातील झाडांचे निरीक्षण करुन प्रादुर्भाव ग्रस्त फुले (डोमकळ्या) शोधून जमा करून नष्ट कराव्यात.

 ऑगस्ट 

कपाशीचे पिक फुलावर असतांना ताण पडल्यास व पाणी देण्याची सोय असल्यास १०-१२ दिवसाच्या अंतराने २ ते ३ संरक्षित ओलीत एकसरी आड द्यावे.

पिकाच्या वाढीच्या अवस्थेत किंवा शेवटच्या डवरणीच्या वेळी डवरयाच्या दात्याला दोरी बांधून सरी काढावी.त्यामुळे पाण्याचे मुलस्थानी संधारण होऊन अधिक पिक उत्पादन मिळेल. कपाशी पिकामध्ये पेरणी नंतर ४० ते ६० दिवसांनी सरया काढाव्यात व अतिवृष्टी झाल्यास जास्तीचे पाणी चर काढून बाहेर काढावे.

गुलाबी बोंड अळी सर्वेक्षणासाठी हेक्टरी ५ फेरोमोन सापळे पिकापेक्षा एक ते दीड फुट उंचीवर लावून त्यामध्ये गुलाबी बोंड अळीचे लिंग प्रलोभने (लयुर ) गॉसीलयुर बसवावे.3

कपाशी पिकावर आकस्मिक मर रोगाचा प्रादर्भाव आढळन आल्यास कॉपर ऑकसीकलोराइड २५ टक्के +१५० ग्रम युरिया १०लिटर पाण्यात घेऊन प्रादुर्भाव ग्रस्त झाडाच्या बुंध्याशी पाठीवरच्या पंपाच्या सहायाने आंबवणी करावी.व झाडाचे खोड व्यवस्थित दाबून घ्यावे. -कपाशीचे पिक फुलोरा अवस्थेत असतांना २ टक्के युरिया (२ किलो युरिया+१०० लिटर पाणी) फवारणीत ५० मी.ली. प्लानोफीक्स मिसळावे.

नत्रयुक्त खतांचा वरखते म्हणून वापर करतांना बागायती कपाशीसाठी १/३ नत्राची मात्रा उगवणीनंतर एक महिन्यांनी आणि उरलेली १/३ नत्राची मात्रा उगवणीनंतर दोन महिन्यांनी द्यावी. ठिबक संचातून खतमात्रा देतांना ती पिकाचे वाट अवस्थेनुसार लागवडीपासून २० दिवसाच्या अंतराने पाच समान भागात व्यावी. रासायनिक खते महाग असल्यामुळे त्याचा वापर करतांना त्याचा तणाएंवजी पिकास भरपूर फायदा होईल अशी दक्षता घ्यावी.तसेच नत्रयुक्त खते पिकांना विभागून दिल्यास त्याचा पिकांना भरपूर फायदा होऊन खतांची कार्यक्षमता सुद्धा वाढते.

ठिबक सिंचनाद्वारे सुद्धा पाण्यात विरघळणारी जी खते आहेत ती पिकांच्या गरजेनुसार व पिक अवस्थेनुसार दिल्यास खतांची बचत होईल व खतांची कार्यक्षमता सुद्धा वाढेल. ठिबक सिंचनाद्वारे रासायनिक खते देण्याची सोय असल्यास पाण्यात विरघळणारी खते पिकानुसार व पिकांच्या वाढीच्या अवस्थे नुसार विभागून दिल्यास रासायनिक खतांची कार्य क्षमता वाढते व उत्पादनात वाढ होते.बीटी कापुस पिकामध्ये अधिक उत्पादन, आर्थिक मिळकत व खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी ठिबक सिंचनाद्वारे शिफारसीच्या १०० टक्के नत्र व पालाश पाच वेळा विभागून तसेच स्फद पेरणीसोबत जमिनीतून देण्याची शिफारस विद्यापीठाची आहे.वरील खताची मात्रा ठिबक सिंचनाद्वारे खालीलप्रमाणे विभागून द्यावी.

खतमात्रापिकाची अवस्था (पेरणी नंतरचे दिवस)
शिफारशीच्या १० टक्के नत्र व पालाशपेरणीच्या वेळी
शिफारशीच्या २० टक्के नत्र व पालाशपेरणी नंतर २० दिवसांनी
 शिफारशीच्या २५ टक्के नत्र व पालाशपेरणी नंतर ४० दिवसांनी
शिफारशीच्या २५ टक्के नत्र व पालाशपेरणी नंतर ६० दिवसांनी
शिफारशीच्या २० टक्के नत्र व पालाशपेरणी नंतर ८० दिवसांनी

सप्टेंबर

पावसात खंड पडला असल्यास खरीप पिकामध्ये वारंवार डवरणी करुन शेत भुसभुशीत ठेवावे.यावेळी डवरयाचे जानकुळास दोरी गुंडाळून पिकांच्या ओळीत चर काढावे जेणेकरून पावसाचे पाणी जागेवरच मुरेल.

कपाशीचे पिक फुलावर असतांना २ टक्के युरिया ( २०० ग्रम युरिया + १० लिटर पाणी ) या प्रमाणात फवारणी करावी.बोंडे भरतांना पावसाचा खंड पडल्यास कपाशीला संरक्षित ओलीत ठिबक सिंचन,तुषार सिंचन किंवा एकसरी आड द्यावे.

रस शोषक किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यास असीटामिप्रीड २० एसपी.१५ ग्रम क्रियाशील घटक प्रती हेक्टर या प्रमाणात फवारणी करावी.१० दिवसाच्या अंतराने ४ ते ५ वेळा ट्रायकोग्रामा या परोपजीवी कीटकांची अंडी असलेली एकरी ३ ट्रायकोकाईस शेतात लावावीत.

गुलाबी बोंड अळीच्या सर्वेक्षणासाठी साधारणत: २० झाडापासून २० हिरवी बॉडे तोडून व फोडून नियमित सर्वेक्षण करावे.

कपाशीवर बोंडअळ्यांच्या व्यवस्थापणाकरिता आर्थिक नुकसानीच्या पातळीवर आधारित अनुक्रमे निमार्क ३०० पिपीएम ५० मिली.,स्पिनोस्याड ४५ एस.सी.२.२२ मिली. आणि बीटासायफ्लुग्रीन २.५ % प्रवाही १० मिली. १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. किंवा ट्रायकोग्रामा १.५ लाख अंडी/हेक्टरी.व फेरोमोन सापळे (हिरव्या बॉडअळीसाठी हेक्झालूर किंवा हेलीलूर तसेच गुलाबी बोंडअळीसाठी गॉसीप्लयुर) हेक्टरी ८ आणी पक्षीयांबे २०/हेक्टरी उभारावेत.

गुलाबी बोंडअळीने १० टक्के फुलांचे किंवा हिरव्या बोंडाचे नुकसान केल्यास किंवा ८-१० पतंग सतत तीन दिवस प्रती कामगंध सापळा या प्रमाणात आढळल्यास १० टक्के नुकसानासह हिरव्या बोंडामध्ये जिवंत अळ्या असल्यास सुरवातीच्या काळात क्लोरोपायरीफॉस ५० % ईसी. २० मिली किंवा प्रोफेनोफॉस ५०% ईसी. ३० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ % डब्लुपी, २० यम या किटकनाशकाची प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. व गरज भासल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५ % एजी ४ ग्रम या किटकनाशकाची पुन्हा फवारणी करावी.

कपाशीचे पिक फुलोरा अवस्थेत असतांना २ टक्के युरिया ( २०० ग्रम युरिया + १० लिटर पाणी) तसेच बोंडे भरण्याचे अवस्थेत २ टक्के डीएपी (२०० ग्रम डीएपी + १० लिटर पाणी)ची फवारणी करावी.

नैसर्गिक कारणामुळे कपाशीची होणारी पात्या,फले,बोंडे यांची गळ कमी करण्यासाठी एनएए (प्लानोफिक्स) या ४ मिली संजीवकाची १० लिटर पाण्यात मिसळून पहिली फवारणी करावी.यानंतर १५-२० दिवसांनी दुसरी फवारणी घ्यावी.

कपाशी या पिकाची कायिक वाट जास्त होऊन बोंडे कमी लागली असल्यास २ ते ३ मिली लीवोसीन १० लिटर पाण्यात मिसळून या वाट प्रतीबंधकाची फवारणी केल्यास झाडांची कायिक वाढ थांबण्यास मदत होते.

कोरडवाहू कपाशीचे पिक फुलावर व बोंडे भरण्याचे अवस्थेत असतांना पाण्याचा ताण पडल्यास व पाणी देण्याची सोय असल्यास २-३ संरक्षक ओलीत (एकसरी आड) दयावे.

ऑक्टोंबर

रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव आढळल्यास उपरोक्त शिफारशीत किटक नाशकांचा वापर करावा.

दहिया रोगाची सुरवात झाल्यास पाण्यात मिसळणारे गंधक २० ग्रम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

कपाशीचे पिक बोंडे भरण्याचे अवस्थेत २ टक्के डीएपी (२०० ग्रम डीएपी + १० लिटर पाणी) ची फवारणी करावी. तसेच बोंडे पक्व होण्याच्या अवस्थेत १ टक्के युरिया अधिक १ टक्के मग्नेशिअम सल्फेट (१०० ग्रम प्रती १०० लिटर पाण्यात ) ची फवारणी करावी व नंतरच्या काळात येणाऱ्या लाल्याचा बंदोबस्त करावा.

ऑक्टोबर महिन्यात पावसाचा खंड पडल्यास ओलीत करावे. बोंडे फुटणे सुरु झाल्यावर पाणी देऊ नये.

कपाशीवरील बोंड अळ्यांचे व्यवस्थापणाकरिता ५ % निंबोळी अर्क,ट्रायको काई(१ लाख अंडी/हेक्टर) व हिरव्या बोंड अळीसाठी (हेलिओथिस)एच.ए.एन.पि.व्हि.(२५० एल.ई.(२x२०/हेक्टर) याचा वापर करावा. रासायनिक किटक नाशके शक्यतोवर टाळावीत.

नोव्हेंबर

नोव्हेंबरच्या आधी गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापणाकरिता सिंथेटिक पायरेथाईडसचावापर कटाक्षाने टाळावा.नोव्हेंबर मध्ये फेनवलेरेट २०% ईसी. ६ मिली किंवा सायपरमेथ्रीन १० % ईसी.८ मिली प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात किटकनाशकांची फवारणी करावी

कपाशीची जातवार स्वच्छ वेचणी करावी.कापूस वेचतांना त्यात काडी कचरा,पती, नख्या,कागदाचे तुकडे, केस इत्यादी येणार नाही याची दक्षता घ्यावी.

वेचलेला कापूस गोडाऊन मध्ये साठवून ठेवत असाल तर गोडाऊन सभोवताली प्रकाश सापळे किंवा कामगंध सापळे लावावेत व अडकलेले पतंग दररोज नष्ट करावेत.

डिसेंबर

कपाशीची वाणानुसार स्वच्छ वेचणी करावी.कोरड्या जागेत कापूस साठवावा .कपाशी ओलसर असल्यास २-३ दिवस स्वच्छ सूर्यप्रकाशात वाळवून कोरड्या जागेत जातवार साठवण करुन विक्री करावी.कवळी कापूस वेगळा करुन सर्वात शेवटी विकावा.

सुधारित कपाशीच्या पहिल्या व दुसऱ्या वेचनीतील कापूस वाळवून कोरड्या जागेत साठवावा .याचे वेगळे जिनिंग करुन सरकीचा उपयोग पुढील वर्षी पेरणी करिता करता येईल.

कपाशीची शेवटची वेचणी आटोपताच शेतात गुरे,टोरे,शेळ्या मेंढ्या चरावयास सोडाव्यात. यामुळे किडींच्या बोंडअळ्या व त्यांचे कोष नष्ट होतील.

कपाशीचे पिक डिसेंबरच्या आत संपवावे.पुढील हंगामातील बोंड अळीचा प्रादुर्भाव टाळण्या साठी फरदड घेऊ नये.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *